जसप्रीत बुमराचे परखड मत

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पराभव पत्करला. मात्र एका पराभवाने संघ खचून जात असेल, तर त्या संघाने कसोटी क्रिकेट खेळू नये, असे परखड मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने व्यक्त केले आहे.

केप टाऊनच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७२ धावांनी पराभव केला. आता शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या पाश्र्वभूमीवर बुमराह म्हणाला, ‘‘एका सामन्यातील निकालाने आत्मविश्वासावर कोणताही परिणाम होऊ नये. जर असे घडत असेल, तर त्या संघाने कसोटी क्रिकेट खेळू नये. चुकांमधून शिकून आगेकूच करायची असते. चूक होत नाही, असा एकही क्रिकेटपटू नाही.

‘‘दक्षिण आफ्रिकेत मी कधीच खेळलो नसल्यामुळे ही पहिली उत्तम कसोटी आणि अनुभवाची शिदोरी माझ्यासाठी होती. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीकडे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे,’’ असे बुमराने सांगितले.

‘‘स्वप्नवत पदार्पण असे या कसोटीला म्हणता येणार नाही. या सामन्यातून काही शिकता आले, तर मला नक्की आनंद होईल. एक गोलंदाज म्हणून पहिला बळी लवकर मिळणे आणि तोही एबी डी’व्हिलियर्ससारख्या फलंदाजाचा मिळणे, हा आनंददायी क्षण होता,’’ असे बुमरा म्हणाला.