वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लग्नाच्या ‘ब्रेक’नंतर आयपीएल फ्रेंचायजी मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत 27 वर्षीय बुमराह टीम इंडियाचा भाग नव्हता, त्यामुळे त्याला क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल.

आयपीएल 2020मध्ये 15 सामन्यांत 27 बळी घेणाऱ्या बुमराहने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, यात तो हॉटेलच्या रूममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. 26 सेकंदाचा हा व्हि़डिओ  मुंबई इंडिन्सनेही शेअर केला आहे.

 

गेल्या हंगामात मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएलनंतर तो संघासमवेत ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला होता.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याने पहिल्या तीन कसोटी सामन्यात 11 विकेट्स घेतल्या. परंतु ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत तो खेळू शकला नाही. मात्र, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनही एकदिवसीय सामने खेळले आणि त्यात चार बळीही टिपले.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत बुमराहने चार विकेट्स घेतल्या. दुसर्‍या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली. गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटीत बुमराहला गोलंदाजी करण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्यानंतर बुमराह चौथी कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळला नाही.

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अँकर संजना गणेशन हिच्यासोबत सोमवारी विवाहबंधनात अडकला. गोव्यात जवळच्या नातेवाईक आणि खास मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

कोण आहे जसप्रीतची पत्नी संजना?

संजना गणेशन ‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला होता. त्यानंतर 2012 मध्ये तिने ‘फेमिना स्टाइल दिवा’मध्ये भाग घेतला होता. 2014 मध्ये संजना ‘फेमिना मिस इंडिया पुणे’ या स्पर्धेची फायनलिस्ट ठरली होती. संजनाने 2019मध्ये क्रिकेट विश्वचषकात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ‘मॅच पॉईंट’ शोचे सुत्रसंचालन केले होते.