भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. क्रिकेटच्या मैदानावर तर हे दोन संघ युद्धाचे रण असल्यासारखे खेळतात. ICC च्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत असेल, तर साऱ्या जगाचे लक्ष या सामन्याकडे लागलेले असते. पाकिस्तानला पराभूत कराच, त्यानंतर स्पर्धा गमावली तरी चालेल, असेही अनेकदा भारतीय चाहते पाहताना आपण ऐकतो.

क्रिकेटच्या प्रतिभेबाबत भारत आणि पाकिस्तान हे दोनही देश तुल्यबळ आहेत. अगदी लहान मुलांपासून ते युवा खेळाडूंपर्यंत सर्व जण क्रिकेटचे चाहते आहेत. अशाच एका पाकिस्तानी चिमुरड्याने आपल्या गोलंदाजीमुळे भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला भुरळ पाडली आहे. उमेर आफ्रिदी याने @afridiomair या ट्विटर हँडलवरून एका ५ वर्षाच्या मुलाच्या गोलंदाजीचा Video ट्विट केला आहे. या Videoमधील मुलगा हा बुमराह सारख्याच स्टाईलने गोलंदाजी करताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत बुमराहची गोलंदाजीची शैली पाहिल्यानंतर तो अशी गोलंदाजी करत आहे, असेही ट्विटसोबत लिहिण्यात आले आहे.

ही गोलंदाजीची शैली पाहून बुमराहलाही त्या चिमुरड्याची भुरळ पडली आहे. माझ्या लहानपणी मी माझ्यापुढे आदर्श असलेल्या गोलंदाजांची शैली पाहायचो आणि त्याची नक्कल करायचा प्रयत्न करायचो. आज आपल्या शैलीची कोणीतरी नक्कल करते आहे, ही बाब खूपच आनंददायी आहे, असे बुमराहने ट्विट केले आहे.