वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा थोड्याच कालावधीत भारताच्या गोलंदाजीचा महत्वाचा भाग बनला. त्याच्या गोलंदाजी करण्याच्या पद्धतीमुळे तो आधीपासून चर्चेत आला होता. पण याच वेगळ्या शैलीमुळे तो सध्या गोलंदाजीत यशस्वी आहे. पण पाकिस्तानच्या एका माजी गोलंदाजाने मात्र त्याच्या या शैलीमुळे त्याला अडचणी येत असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर बुमराहने सणसणीत उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज आकिब जावेद याने बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीवर प्रशचिन्ह उपस्थित केले होते. त्याच्या या शैलीमुळेच तो दुखापतग्रस्त होतो अशी टीका जावेदने केली होती. त्यावर क्रिकेटमध्ये कोणतीही शैली किंवा पद्धत ही अचूक नसते. कारण सर्वच गोलंदाज कधी ना कधी दुखापतग्रस्त होतात, असे त्याने उत्तर दिले.

तो म्हणाला की मी जाणकारांच्या टीकांकडे लक्ष देत नाही. मी केवळ माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. कोणत्या गोष्टींमुळे मला गोलंदाजीत सुधारणा करण्यास मदत मिळते आणि कोणत्या गोष्टीमुळे माझी शारीरिक तंदुरुस्ती कायम राहते, याकडे माझे लक्ष असते.

मी माझी शैली जाणतो. क्रिकेटमध्ये कोणतीही शैली किंवा पद्धत ही योग्य किंवा अयोग्य नसते. आपल्या पद्धतीनुसार ती आत्मसात केली जाते. कारण सर्वच गोलंदाज कधी ना कधी दुखापतग्रस्त होतात. त्यामुळे मी या साऱ्याकडे लक्ष न देता केवळ माझ्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष पुरवतो, असेही तो म्हणाला.