ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहा गड्यांनी विजय मिळवत ३ सामन्याच्या मालिकेत १-१ बरोबरी केली. या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली. तर माजी कर्णधार धोनीने अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात धोनीने नाबाद ५५ धावांची खेळी करत टिकाकरांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहिल्या सामन्यात संथ खेळी केल्याने त्याच्यावर टिका होत होत्या. मात्र दुसऱ्या सामन्यात धोनीने कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ न जाऊ देता उत्तम शॉट्स मारत सामना जिंकून दिला.

धोनीने दुसऱ्या सामन्यात केलेल्या निर्णायक खेळीमुळे त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही धोनीची स्तुती केली आहे. दिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते, असे ट्विट बुमराहने धोनी आणि विराटसाठी केले आहे. पहिल्या सामन्यात धोनीने ९७ धावांत ५१ धावांची खेळी केली होती त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. पण दुसऱ्या सामन्यात धोनीने ५५ धावांची संयमी फलंदाजी करत टिकाकारांना उत्तरे दिली आहेत.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं दिलेलं २९९ धावांचं आव्हान भारतानं लिलया पेललं. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ९ बाद २९८ धावा केल्या. शॉन मार्शने १२३ चेंडूंमध्ये १३१ धावांची खेळी केली. भारताने ४९.२ षटकांमध्ये या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. कर्णधार विराट कोहलीने ११२ चेंडूंमध्ये १०४ तर महेद्रसिंग धोनीने ५४ चेंडूंमध्ये नाबाद ५५ धावा केल्या. आता निर्णायक सामन्यात बाजी मारत मालिका विजय करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.