जसप्रीत बुमराहने फार कमी कालावधीत भारतीय संघामध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. आपल्या गोलंदाजीची खास शैली, भन्नाट यॉर्कर यामुळे बुमराहचे चेंडू अनेक फलंदाजांना समजतच नाही. भारतीय संघात संधी मिळाल्यापासून फार थोड्या काळात बुमराहने संघाचा प्रमुख गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वासिम अक्रमने बुमराहला एक मोलाचा सल्ला दिला आहे. बुमराहने भविष्यात काऊंटी क्रिकेट खेळण्याच्या फंदात पडू नये असं अक्रमने म्हटलंय.
“गेल्या काही वर्षांत क्रिकेटचा अतिरेक होतो आहे. जसप्रीत बुमराह सारख्या गोलंदाजाने गेल्या काही वर्षांच आश्वासक कामगिरी केली आहे. तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याची कामगिरी पाहता मी त्याला काऊंटी क्रिकेट न खेळण्याचा सल्ला देईन. त्यात बुमराह सध्या तिन्ही प्रकाराचं क्रिकेट खेळतोय, त्यामुळे त्याने काऊंटी क्रिकेटच्या फंदातच पडू नये. बुमराहसारख्या तरुण गोलंदाजांनी अधिकाधिक स्थानिक क्रिकेट खेळलं पाहिजे. इथूनच त्यांची गोलंदाजीत सुधारणा होऊ शकते.” वासिम अक्रम माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्राच्या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
सध्या जगभरात करोना विषाणूमुळे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. सर्व महत्वाच्या स्पर्धा या काळात बंद आहेत. काही देशांत क्रीडा विश्वावर अवलंबून असलेलं अर्थचक्र सुरु करण्यासाठी स्पर्धांना प्रेक्षकांविना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र भारतात बीसीसीआयने क्रिकेट सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आयपीएलचा तेरावा हंगामही बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 3:11 pm