भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०१८-१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी जसप्रीतची बीसीसीआयच्या मानाच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून बुमराहचा सन्मान होणार आहे. २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या जसप्रीतने आपल्या तेजतर्रार माऱ्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं आहे. जसप्रीतने केवळ १२ कसोटी सामन्यांत ६२ बळी मिळवत फार कमी कालावधीत संघातलं आपलं स्थान पक्कं केलं. याचसोबत अनेक महत्वाच्या मालिकांमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात बुमराहची भूमिका महत्वाची होती. त्याच्या याच कामगिरीचा आता बीसीसीआयतर्फे सन्मान केला जाणार आहे.
जाणून घेऊयात बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यातील इतर सन्मानार्थी खेळाडूंची यादी –
कर्नल सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्कार – कृष्णम्माचारी श्रीकांत : (प्रमाणपत्र-सन्मानचिन्ह आणि २५ लाखांचा धनादेश)
महिला खेळाडूंसाठी जीवनगौरव पुरस्कार – अंजुम चोप्रा : (प्रमाणपत्र-सन्मानचिन्ह आणि २५ लाखांचा धनादेश)
पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू – जसप्रीत बुमराह : (प्रमाणपत्र-सन्मानचिन्ह आणि १५ लाखांचा धनादेश)
सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू – पूनम यादव : (प्रमाणपत्र-सन्मानचिन्ह आणि १५ लाखांचा धनादेश)
याव्यतिरीक्त २०१८-१९ सालात कसोटीत सर्वाधिक धावा करण्यासाठी चेतेश्वर पुजारा, सर्वाधिक बळी घेण्यासाठी जसप्रीत बुमराह यांचा सत्कार होणार आहे. तर महिला क्रिकेटपटूंमध्ये वन-डे सामन्यात सर्वाधिक धावांसाठी स्मृती मंधाना तर सर्वाधिक बळी घेण्यासाठी झुलन गोस्वामी यांची निवड करण्यात आलेली आहे. मयांक अग्रवालला सर्वोत्तम पदार्पण पुरुष तर शेफाली वर्माला सर्वोत्तम पदार्पण महिला खेळाडू या किताबाने गौरवण्यात येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2020 5:17 pm