भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताच्या वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी घातक गोलंदाजी करत पहिल्या सत्रात न्यूझीलंडचा अर्धा संघ गारद केला. प्रमुख गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह मात्र विकेट घेण्यात अपयशी ठरला. तरीही तो ट्विटरवर एका कारणामुळे जबरदस्त ट्रेंड होऊ लागला.

पाचव्या दिवशी बुमराह अनावधानाने चुकीची जर्सी घालून मैदानात उतरला. या खास सामन्यासाठी टीम इंडियाला वेगळी जर्सी मिळाली आहे, पण तो नियमित जर्सीमध्ये गोलंदाजी करताना दिसला. पाचव्या दिवशी त्याने गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने पहिले षटक चुकीची जर्सी घालून टाकले. या षटकानंतर त्याने जर्सी बदलण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये धाव घेतली.

हेही वाचा – VIDEO : पुन्हा पुन्हा पाहावा असा चेंडू..! शमीकडून वॉटलिंगच्या स्वप्नांना सुरूंग

 

उपाहारापर्यंत न्यूझीलंड (पाचवा दिवस)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा आज पाचवा दिवस आहे. या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. २ बाद १०१ धावांवरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडची उपाहारापर्यंत ५ बाद १३५ धावा अशी अवस्था झाली आहे. मोहम्मद शमीने भारताला पाचव्या दिवशी लवकर यश मिळवून दिले. न्यूझीलंडचा रॉस टेलर वैयक्तिक ११ धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिलने टेलरचा झेल घेतला. त्यानंतर इशांत शर्माने हेन्री निकोलसला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकरवी झेलबाद करत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. निकोलसने ७ धावा केल्या. कारकिर्दीची शेवटची कसोटी खेळणाऱ्या बीजे वॉटलिंगही पहिल्या डावात काही खास करू शकला नाही. मोहम्मद शमीने त्याचा एका धावेवर त्रिफळा उडवला. न्यूझीलंडचा संघ अजून ८२ धावांनी पिछाडीवर आहे. त्यांची भिस्त केन विल्यमसनवर असून तो १९ आणि ग्रँडहोमे शून्यावर नाबाद आहे.