भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज आणि सध्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहने, आपल्या आईसाठी ट्विटर अकाऊंटवर एक खास संदेश लिहीला आहे. आपल्या आईच्या आठवणीत बुमराह भावुक झालेला पहायला मिळाला.

वयाच्या सातव्या वर्षी बुमराहच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर बुमराहची आई दलजित कौर यांनी अहमदाबाद येथील एका शाळेत शिक्षिकेची नोकरी पत्करली. काही दिवसांपूर्वी त्याच शाळेतून दलजित कौर या मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. यावेळी जसप्रीत बुमराहने, आईने आपल्यासाठी घेतलेल्या सर्व कष्टांची आठवण करत, आता तु फक्त आराम कर असा संदेश दिला आहे.

वडिलांच्या निधनानंतर आईच्या पाठींब्यावर जसप्रीत बुमराहने क्रिकेटचे धडे घेण्यास सुरुवात केली. टीम इंडियात मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत बुमराहने संघातलं आपलं स्थान पक्क केलं. सध्या जसप्रीत टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जातो.