पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटर जावेद मियाँदाद याने देशाचे पंतप्रधान इम्रान खानविरूद्ध स्फोटक विधान केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर परदेशी लोकांची नेमणुक करत पाकिस्तानमधील क्रिकेटची अवस्था उध्वस्त केल्याचा आरोप मियाँदादने इम्रान खानवर केला आहे. मियाँदादने या विधानाद्वारे अप्रत्यक्षपणे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांच्याकडे बोट दाखवले. वसीम खान यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून त्यांचं बहुतांश आयुष्य त्यांनी परदेशात जगलं, तरीदेखील इम्रान खान यांनी वसीम खान यांना देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या महत्त्वाच्या पदासाठी नियुक्त केल्याबद्दल मियाँदादने नाराजी व्यक्त केली.

“पाक क्रिकेट बोर्डातील अनेक अधिका्यांना खेळाचे मूलभूत ज्ञानही नाही. त्यामुळे इम्रान खानशी मी या वाईट परिस्थितीबद्दल वैयक्तिकरीत्या चर्चा करणार आहे. देशाच्या क्रिकेटसाठी अयोग्य असलेल्या व्यक्तिंना मी त्या पदांवर अजिबात राहू देणार नाही. पंतप्रधान इम्रान खान, तू महत्त्वाच्या पदावर परदेशी व्यक्ती नेमल्या आहेत. भ्रष्टाचार करून हे लोक देश सोडून पळून जातील तेव्हा काय होईल? आपल्याच देशात प्रतिभावंतांची कमतरता आहे का की तुला बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांसाठी परदेशातून लोकांना आणावे लागले? राजकारणात मी तुझा कर्णधार आहे हे विसरू नका. मी तुला राजकारणात आणलं आणि आता तू स्वत:ला देव समजत आहेत हे योग्य नाही”, असे खडेबोल मियाँदादने इम्रान यांना उद्देशून सुनावले. मियाँदाद आपल्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर बोलत होता.

“इम्रान खानचं वागणं म्हणजे आपण या देशातील एकमेव हुशार व्यक्ती आहोत असं आहे. जणू कोणी पाकिस्तानी ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज किंवा इतर कोणत्याही विद्यापीठात गेलाच नाही. लोकांचा विचार करा. तुला देशाची पर्वा नसेल. पण हे लक्षात ठेव की तू माझ्या घरी मदत मागायला आला होतास. त्यानंतर पंतप्रधान झाला आहेस आणि हे सत्य तू नाकारू शकत नाहीस”, असं आव्हानही मियाँदादने इम्रान खानला दिलं.