पुलवामा हल्ल्यानंतर बीसीसीआयने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी होत आहे. बीसीसीआयही आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांच्या मदतीची अपेक्षा करत पाकिस्तानला एकटं पाडण्याच्या तयारीत आहे. मात्र भारताचे आरोप हे चुकीचे असून बीसीसीआयचं वागणं बालिशपणाचं असल्याचं वक्तव्य पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने केली आहे.

“बीसीसीआयचं वागणं हे अतिशय बालिशपणाचं आहे, आयसीसी या मागणीला अजिबात विचारात घेणार नाही. आयसीसीशी संलग्न प्रत्येक देशाला महत्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे.” असोसिएट प्रेसशी बोलत असतातान मियांदादने आपलं मत मांडलं. बीसीसीआयची क्रिकेट प्रशासकीय समिती विश्वचषकात भारताने पाकविरुद्ध खेळावं की नाही यावर निर्णय घेणार आहे. सरकारशी चर्चा केल्यानंतर यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल असं प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – राजकीय फायद्यासाठी क्रिकेटला लक्ष्य करणं चुकीचं – सरफराज अहमद

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानसोबत खेळासोबतच सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत अशी मागणी केली होती. मात्र मियांदादने सौरव गांगुलीवरही टीका केली आहे. “माझ्या मते सौरव आगामी निवडणुकीत उभं राहण्याची तयारी करतो आहे. त्याला मुख्यमंत्री बनायचं असेल, याचसाठी तो आपल्या लोकांसमोर अशी वक्तव्य करतोय. पाकिस्तानने भारताच्या या वागण्याकडे लक्ष न देता स्वतःमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे.” मियांदाद बोलत होता.