रिओमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने दुसरे सुवर्णपदक पटकावले. भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने विश्वविक्रम रचत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे अथेन्स येथे २००४ साली झालेल्या पॅरालिम्पिकमध्येही देवेंद्रने सुवर्णपदक पटकावले होते. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ३६ वर्षीय देवेंद्रने ६३.९७ मीटर भालाफेक करून विश्वविक्रम रचला. अथेन्समध्ये त्याने ६२.१५ मीटर भालाफेक केला होता.

रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. राजस्थानचा असलेला देवेंद्रला २००४ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१२मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला पॅरालिम्पियनपटू आहे.

झाडावर चढताना देवेंद्रला विजेचा धक्का बसला होता. त्यात त्याचा एक हात अर्धा निकामी झाला. तरीसुद्धा खचून न जाता त्याने क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी केली. देवेंद्रने यापूर्वी आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पियन समिती आयोजित जागतिक स्पर्धेतही सुवर्ण पदक पटकावले होते. २००८ आणि २०१२ च्या पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे या स्पर्धेत देवेंद्रला सहभागी होता आले नव्हते. २००४ साली अथेन्समध्ये सुवर्ण पदक पटकावल्यानंतर त्याने १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकले.

रिंकू हुडाही भालाफेक प्रकारात सहभागी झाली होती. परंतु तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने ५४.३९ मीटरपर्यंत भालाफेक केला.