जय कवळी, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे महासचिव

तुषार वैती

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

भारतीय बॉक्सिंग गेल्या काही महिन्यांपासून एक वेगळीच उंची गाठत आहे. देशाला बॉक्सिंग या खेळाकडून आता अपेक्षा वाढू लागल्या आहेत. जॉर्डन येथील आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी टोक्यो ऑलिम्पिकच्या नऊ जागा निश्चित करून ऐतिहासिक कामगिरी केली. यापुढेही हा आकडा वाढत जाणार आहे. त्यामुळे बॉक्सिंग या खेळातून देशाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तीन ते चार पदके हमखास मिळतील, असा विश्वास भारतीय बॉक्सिंग महासंघाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केला. भारतीय बॉक्सर्सच्या कामगिरीविषयी आणि ऑलिम्पिकमधील योजनांविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत –

* भारताच्या तब्बल नऊ बॉक्सर्सनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले. या ऐतिहासिक यशाबद्दल काय सांगाल?

भारतीय बॉक्सिंग सक्षम झाल्याचे हे द्योतक आहे. हे यश गेल्या २-३ वर्षांतील नाही. गेल्या दीड-दोन दशकांमध्ये तळागाळातील बॉक्सिंगला यशोशिखरावर नेण्यासाठी जिवापाड मेहनत करणाऱ्या मंडळींचे हे यश आहे. मेरी कोम, विकास कृष्णन, सतीश कुमार हे आमचे अनुभवी बॉक्सर घडविण्यात या मंडळींचा मोठा वाटा आहे. भारतीय बॉक्सर्सनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. याआधी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे तब्बल ८ खेळाडू सहभागी झाले होते. त्यानंतर आता नऊ बॉक्सर्सनी ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देशाचा नावलौकिक उंचावला आहे.

* २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमध्ये फारसे यश मिळाले नव्हते, त्याविषयी तुमचे मत काय आहे?

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे तीनच बॉक्सर पात्र ठरले होते. २०१२ आणि २०१६ या काळात भारतीय बॉक्सिंग गृहकलहामध्ये अडकली. घरातले वातावरण बिघडले की, त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. तेच चित्र भारतीय बॉक्सिंगमध्ये पाहायला मिळत होते. त्यामुळे बॉक्सिंगची सक्षम संघटना असणे कितपत महत्त्वाचे आहे, हे त्या वेळी अधोरेखित होत होते. शासनाच्या मदतीने सर्व काही सुरू होते. पण संघटनेशिवाय यश मिळवता येत नाही, हेच बॉक्सिंगमधील भारताच्या कामगिरीवरून लक्षात येईल.

* सध्या करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याचा परिणाम खेळाडूंच्या तयारीवर कसा होऊ शकतो?

करोनामुळे सध्या अनेक स्पर्धावर संक्रांत आली असली तरी त्याचा परिणाम भारताच्या युवा खेळाडूवर होऊ शकणार नाही, असे मला वाटते. पण वय आपल्या हातात नसल्यामुळे मेरी कोम, विकास कृष्णन यांच्यावर थोडय़ा फार प्रमाणात तणाव येऊ शकतो. पण ही परिस्थिती हाताळण्यातिपत ते परिपक्व आहेत. मेरी कोम सध्या ३७ वर्षांची असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धाच रद्द झाली तर तिला नैराश्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

* टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग या खेळातून देशाला किती पदकांची अपेक्षा बाळगता येईल?

सध्या भारताचे नऊ बॉक्सर टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. पण हा आकडा १२ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. पॅरिस येथे मे महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे आणखी दोन ते तीन जण आपले स्थान निश्चित करतील, अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे १२पैकी किमान तीन ते चार पदके भारताला बॉक्सिंग या खेळातून मिळू शकतील. मेरी कोम, विकास कृष्णन, अमित पांघल यांच्याकडून पदकाची हमखास अपेक्षा बाळगता येईल. त्याचबरोबर एखाद-दुसरा आश्चर्याचा धक्का देण्याइतपत भारतीय बॉक्सर क्षमतावान आहेत.

* ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या बॉक्सर्सच्या पुढील तयारीचे नियोजन कसे असेल?

कित्येक महिन्यांपासूनच आम्ही पुढील योजना तयार केली आहे. मुख्य प्रशिक्षक, कामगिरी उंचावणारे प्रशिक्षक यांनी सर्व काही नियोजन केले आहे. परदेशी दौऱ्यांचे आमचे वेळापत्रकही तयार आहे. केंद्र सरकार तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) आम्हाला पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यामुळे जय्यत तयारीनिशी आमचे बॉक्सर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतील.