महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांनी देशाला १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विश्वचषक जिंकवून दिला असला तरी त्यांचे आणि श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळामधले मतभेद संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. विश्वविजयानंतर मायदेशात दाखल झाल्यावर जयवर्धने आणि संगकारा यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. पण त्यांनी केलेले आरोप मात्र मंडळाच्या प्रशासकीय समितीने फेटाळले आहेत.मंगळवारी जयवर्धने आणि संगकारा यांनी पत्रकार परिषद घेत मंडळाचे सचिव निशांत रणतुंगा आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी अश्ले डी’सिल्व्हा यांनी बांगलादेशला जाण्यापूर्वी मानसिक खच्चीकरण केल्याचे म्हटले होते.
जयवर्धने आणि संगकारा यांनी आपल्या निवृत्तीबाबत निर्णय घेताना मंडळातील व्यक्तींशी सल्ला-मसलत करावी, असे मंडळातील अधिकाऱ्यांचे मत आहे.
‘‘मंडळाचे सचिव आणि मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात संघातील वरिष्ठ खेळाडूंनी भाष्य करणे अप्रमाणित आहे. त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी या खेळाडूंनी सत्यतेची पडताळणी करायला हवी होती,’’ असे श्रीलंकेच्या मंडळाने पत्रकात म्हटले आहे.