05 March 2021

News Flash

स्पष्टवक्ता!

नावाजलेला खेळाडू जर चुकत असेल किंवा त्याच्याकडून काही गैरकृत्य झाले असेल, तर त्याच्याविरुद्ध टीका आणि कारवाई

| September 22, 2013 04:56 am

नावाजलेला खेळाडू जर चुकत असेल किंवा त्याच्याकडून काही गैरकृत्य झाले असेल, तर त्याच्याविरुद्ध टीका आणि कारवाई करण्यासाठी संघटकाकडे धाडस आवश्यक असते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव जयवंत लेले यांच्यात हे धाडस होते. धाडसी विधाने करण्याबरोबरच धाडसी निर्णय घेण्याबाबतही ते विशेष ओळखले जायचे.
लेले हे काही खूप गाजलेले खेळाडू नव्हते, परंतु आपल्या तांत्रिक बुद्धीचा उपयोग क्रिकेट संघटकाचे काम करताना त्यांनी केला. साराभाई केमिकल्स कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करीत असताना एकीकडे त्यांनी क्रिकेटचा छंद जोपासला. त्यांनी पंच म्हणूनही काम केले. अनेक वर्षे क्रिकेट मंडळावर काम करताना त्यांनी आपल्या आगळ्या-वेगळ्या संघटनशैलीचा ठसा उमटविला होता. या माणसाकडे संघटन कौशल्य आहे, हे ओळखून विजय हजारे यांनी १९६०मध्ये त्यांना बडोदा क्रिकेट संघटनेत आणले. या संघटनेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून १९६३मध्ये त्यांची निवड झाली. १९७०मध्ये त्यांनी या संघटनेच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली. १९९०मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे संयुक्त सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली तर १९९६मध्ये ते सचिवपदी निवडून आले.
मंडळावर अनेक वर्षे काम करताना लेले यांची कारकीर्द खूप गाजली. धाडसी विधाने करण्याबाबत त्यांची ख्याती होती. त्यामुळेच की काय प्रसारमाध्यमांना त्यांच्याकडून नेहमीच चर्चेसाठी काही तरी स्फोटक विधाने मिळत असत आणि लेले देखील आपल्या या विधानाशी चिकटून असायचे. काही वेळा त्यांनी अशा विधानांचा इन्कार केला होता, तरीही स्पष्टवक्ता म्हणून त्यांची छबी कधी लपली नाही.
क्रिकेटमध्ये सर्वात गाजलेले मॅच-फिक्सिंग प्रकरण २०००मध्ये उघडकीस आले. त्या वेळी किक्रेट मंडळावर ते सचिव म्हणून काम करीत होते. भारताचे मोहम्मद अझहरुद्दीन, अजय जडेजा, अजय शर्मा व मनोज प्रभाकर या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा या प्रकरणात समावेश होता. त्यांच्याविरुद्ध टीका करण्याचेही कोणी धाडस दाखवत नसत. मात्र लेले यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड समितीची नियुक्ती केली व या समितीमार्फत कारवाईही केली. अझहरुद्दीन व शर्मा यांच्यावर आजीवन बंदीची कारवाई झाली तर जडेजा व प्रभाकर यांच्यावर पाच वर्षांकरिता खेळण्यास मनाई करण्यात आली. साहजिकच या चारही खेळाडूंची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. त्याचबरोबर लेले यांनी या प्रकरणात अडकलेला दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिए व त्याच्या अन्य काही सहकाऱ्यांविरुद्ध केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची विनंती केली. ही विनंती मान्य झाली व नंतर क्रोनिएवर कारवाईही झाली. कालांतराने क्रोनिएने आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिली होती.
खेळाडू असो किंवा प्रशिक्षक असो त्यांनी मंडळाचा शिष्टाचार व नियमावलीचे पालन केलेच पाहिजे, असे लेले हे नेहमी सांगत असत. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कपिल देव असताना त्यांनी बीसीसीआयची संमती न घेताच अजित आगरकर याला राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी करून घेतले. त्या वेळी नियमावलीचा भंग केल्याबद्दल लेले यांनी कपिल यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. कपिल व लेले यांच्यामधील हा वाद त्या वेळी खूपच गाजला होता.
अतिशय विश्वासू व उत्साही संघटक म्हणून लेले यांचा नावलौकिक होता. त्यांच्या काळात क्रिकेट मंडळाला प्रथमच काहीशे कोटी रुपयांचे प्रायोजकत्व मिळाले. स्पर्धा व प्रायोजक यांची योग्य रीतीने सांगड घातली, तरच हा खेळ अधिक श्रीमंत होईल असे त्यांचे मत होते आणि त्यांनी त्याप्रमाणेच खेळात अधिकाधिक पैसा आणण्याचा प्रयत्न केला. बडोदा ही आपली मायभूमी आहे, हे ओळखून त्यांनी या संघटनेशी संलग्न असलेल्या प्रत्येक खेळाडूच्या विकासावर भर दिला होता. अनेक खेळाडूंना त्यांनी मंडळातील स्वत:च्या ताकदीचा उपयोग करीत भारतीय संघाची द्वारे खुली केली. नवनवीन ठिकाणी क्रिकेटचे अव्वल दर्जाचे सामने आयोजित केले गेले तर तेथील चाहत्यांच्या संख्येत वाढ होईल व आपोआपच प्रायोजक वाढण्यासही मदत होईल, हा दृष्टिकोन लेले यांच्याकडे होता. वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघटनांमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला, तर संघांमधील समन्वयही आपोआप वाढेल असेच लेले यांचे मत होते आणि त्यानुसार त्यांनी विविध देशांच्या संघटनांमध्ये सुसंवाद वाढविला. स्पष्टवक्ता तरीही मनमिळाऊ संघटक म्हणूनच त्यांची ख्याती होती. सदैव हसतमुखपणे वावरणारा हा संघटक म्हणूनच सर्वाच्या लक्षात राहतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 4:56 am

Web Title: jaywant lele the jolly raconteur former secratary of bcci a straitforward personality
Next Stories
1 रत्नाकर शेट्टी यांना उच्च न्यायालयाचाही दिलासा
2 भारताकडून हाँगकाँगचा धुव्वा
3 राजस्थान रॉयल्सची विजयी सलामी
Just Now!
X