नोव्हाक जोकोव्हिच आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेचे जोकोव्हिचचे हे तिसरे जेतेपद आहे. रॉजर फेडररलाही या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची संधी होती. मात्र गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत असल्यामुळे फेडररने माघार घेतल्याने जोकोव्हिचचा मार्ग सुकर झाला. अंतिम लढतीत जोकोव्हिचने खोलवर सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध मिलास राओनिकचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. २७ चुका आणि स्वैर सव्‍‌र्हिस यामुळे राओनिक जोकोव्हिचला टक्करही देऊ शकला नाही.
महिला गटाची अंतिम लढत एकतर्फी झाली. व्हिक्टोरिया अझारेन्काने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला ६-४, ६-४ असे नमवले. जेतेपदासह अझारेन्काने २०१४ नंतर जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळवले आहे. ३२ डिग्री वातावरणात सेरेनाच्या हातून भरमसाट चुका झाल्या. तडाखेबंद सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध सेरेना लौकिकाला साजेसा खेळ करू शकली नाही आणि अझारेन्काने याचा पुरेपूर फायदा उठवत सरशी साधली.
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संयोजकांवर सेरेनाची टीका
इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेचे संचालक रेमंड मूर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने जोरदार ताशेरे ओढले आहेत. ‘‘मी महिला खेळाडू असतो तर रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांना निर्माण केल्याबद्दल दररोज देवाचे आभार मानले असते. कारण तेच खेळाचा वारसा पुढे नेत आहेत,’’ असे धक्कादायक वक्तव्य ६९ वर्षीय मूर यांनी स्पर्धेदरम्यानच्या पत्रकार परिषदेत केले होते. सेरेनाने या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
‘‘कोणत्याही महिलेने कोणासमोरही गुडघे टेकत अभिवादन करण्याची गरज नाही. मी किंवा माझ्या बहिणीचा खेळ पाहण्यायोग्य नाही असा दावा करणाऱ्या प्रेक्षकांची संख्या संयोजकांनी सांगावी. मूर यांचे वक्तव्य चुकीचे आहे. चांगला खेळ दाखवणाऱ्या अनेक टेनिसपटू आहेत. ज्यांचा खेळ पाहण्यायोग्य नाही असेही असंख्य पुरुष खेळाडू आहेत. हे दोन्हीबद्दल म्हणता येईल. मूर यांच्या बोलण्याला युक्तिवाद नाही,’’ असे सेरेना म्हणाली. दरम्यान, मूर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र माफी मागण्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचार करायला हवा होता, असा टोला सेरेनाने लगावला आहे.