भारताची सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज हिला ट्वेन्टी-२० महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेध लागले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सलामीच्या लढतीत खेळण्यासाठी मी उत्सुक असून हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचा सामना असल्याचे जेमिमाने सांगितले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नेहमीच विजयासाठी चुरस रंगते. नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत साखळी गटात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला होता; पण अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. वेस्ट इंडिजमध्ये गेल्या वेळी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने साखळी फेरीत ऑस्ट्रेलियावर सरशी साधली होती.

‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत मी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन भूमीत त्यांच्याशीच दोन हात करणार आहे. माझ्या मते, हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचा सामना ठरणार आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करण्याकडे माझे लक्ष लागले आहे,’’ असे जेमिमाने सांगितले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात दमदार फलंदाजांची फळी आहे. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या इलिस पेरी, मेग लॅनिंग आणि अलिसा हिली भारताला नेहमीच भारी पडतात. ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगान शूट हिने मात्र मानधनाची स्तुती केली आहे. ती म्हणते, ‘‘मानधना ही दर्जेदार फलंदाज आहे. तिने असंख्य वेळा मला सीमारेषा दाखवली आहे. डावखुरी फलंदाज असल्याने ती मैदानाच्या चौफेर फलंदाजी करू शकते.’’

१९८३च्या विश्वविजयाची पुनरावृत्ती होऊ शकते – रामन

कपिल देव यांनी १९८३च्या विश्वचषक स्पर्धेत केलेल्या विश्वविजेतेपदाची पुनरावृत्ती करण्याची क्षमता भारतीय महिला संघात आहे. भारतीय महिला संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार समजला जात आहे, असे मत भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन यांनी व्यक्त केले.

‘‘२०१७च्या विश्वचषकात उपविजेतेपद आणि २०१८च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी सध्या दिवसेंदिवस सुधारत आहे. तंदुरुस्ती, मैदानावर जीव ओतून काम करण्याची वृत्ती तसेच फलंदाजीचा वेगळा दृष्टिकोन यामुळे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहे. गेल्या सहा महिन्यांत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्याची नामी संधी आहे,’’ असेही रामन म्हणाले.