श्रीलंकेतील काटुनायके येथील मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या टी-२० मालिकेत भारतीय महिलांनी पहिला सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मुंबईकर जेमिया रॉर्ड्रीग्ज आणि पुनम यादवने केलेल्या खेळाच्या जोरावर भारतीय महिलांनी श्रीलंकेवर १३ धावांनी मात केली. याआधी ३ वन-डे सामन्यांची मालिकाही भारतीय महिलांनी २-१ अशी जिंकली होती. टी-२० मालिकेतला दुसरा सामना शुक्रवारी कोलंबोत खेळवला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईकर जेमिया रॉर्ड्रीग्जने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा समाचार घेत १५ चेंडूत ३६ धावा पटकावल्या. टी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात ३ षटकार ठोकण्याचा मानही यादरम्यान जेमियाने आपल्या नावावर केला. याचसोबत तानिया भाटीया (४६ धावा) आणि अनुजा पाटील (३६ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिलांनी २० षटकात १६८ धावांपर्यंत मजल मारली.

प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या महिलांनीही डावाची आक्रमक सुरुवात केली. यसोदा मेंडीस आणि चमारी अट्टापट्टूने २.५ षटकात आपल्या संघाला ३९ धावांपर्यंत मजल मारुन दिली. अरुंधती रेड्डीने श्रीलंकेची ही जमलेली जोडी फोडली. यानंतर श्रीलंकेच्या फलंदाज सामन्यात आपलं आव्हान कायम राखण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र फिरीकपटू पूनम यादवने ठराविक अंतराने लंकेला धक्का देणं सुरुच ठेवलं. अखेर १३ धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jemimah rodrigues poonam yadav help india take 1 0 t20 series lead vs sri lanka
First published on: 19-09-2018 at 21:38 IST