कोलंबोत खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांनी श्रीलंकेवर ५ गडी राखून मात केली. या विजयासह भारतीय महिलांनी ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता. मुंबईकर जेमायमा रॉर्ड्रीग्जने सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे.

सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या भारतीय महिलांनी श्रीलंकेच्या संघाला १३१ धावांवर रोखलं. शशिकला सिरीवर्धने – निलाक्षी डी सिल्वा या खेळाडूंनी अनुक्रमे ३५ व ३१ धावांची खेळी करुन संघाची धावसंख्या उभारण्यात मोठा हातभार लावला. भारताकडून अरुंधती रेड्डी आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने दोन बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारतीय महिलांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. मुंबईकर जेमायमा रॉड्रीग्जने ४० चेंडूत ५७ धावांची अर्धशतकी खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जेमायमाच्या खेळीत दोन षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने कर्णधार हरमनप्रीत कौरनेही जेमायमाला चांगली साथ दिली. मात्र चमारी अट्टापट्टूच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला. मात्र विजयासाठी आवश्यक असलेल्या १९ धावा वेदा कृष्णमुर्तीने अनुजा पाटीलच्या सहाय्याने पूर्ण करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.