उपांत्यपूर्व लढतीत पुतिनत्सेवावर सहज मात; पुरुष एकेरीत झ्वेरेव्ह, बुस्टा यांचे विजय

अमेरिकेच्या २८व्या मानांकित जेनिफर ब्रॅडीने कारकीर्दीत प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत शुक्रवारी तिच्यासमोर जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान असेल. २०१८च्या विजेत्या ओसाकाने अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सचा ६-३, ६-४ असा पराभव केला. पुरुष एकेरीत जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि स्पेनचा पॅब्लो कॅरेनो बुस्टा यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळत असूनही ब्रॅडीने कझाकस्तानच्या युलिया पुतिनत्सेवाला ६-३, ६-२ असे नमवले. फ्लोरिडा येथील ख्रिस एव्हर्ट यांच्या अकादमीत टेनिसचे धडे गिरवणाऱ्या ब्रॅडीचा खेळ पाहण्यासाठी एव्हर्ट स्वत: उपस्थित होते.

पुरुष एकेरीत झ्वेरेव्हने यंदाच्या वर्षांत दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली. त्याने क्रोएशियाच्या बोर्ना कॉरिकला १-६, ७-६, ७-६, ६-३ असे पराभूत केले. पहिला सेट गमावल्यावरही झ्वेरेव्हने बाजी मारली. त्याच्यासमोर उपांत्य फेरीत बुस्टाचे आव्हान असेल. चौथ्या फेरीत सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच अपात्र ठरल्याने बुस्टाला आगेकूच करता आली होती. त्या संधीचा त्याने चांगलाच फायदा घेतला. उपांत्यपूर्व फेरीत पाच सेटवर रंगलेल्या लढतीत बुस्टाने कॅनडाच्या डेनिस शापोवालोवचा ३-६, ७-६, ७-६, ०-६, ६-३ असा पराभव केला.

ओसाकाची मुखपट्टीद्वारे फ्लॉइड यांना श्रद्धांजली

यंदाच्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत नाओमी ओसाका ही तिच्या खेळापेक्षा ती घालत असलेल्या मुखपट्टय़ांसाठी चर्चेत आहे. ती प्रत्येक लढतीत वर्णद्वेषाला बळी पडलेल्यांच्या नावांची मुखपट्टी घालत आहे. उपांत्यपूर्व फेरीत ओसाकाने अमेरिकेत पोलिसाच्या अत्याचारात बळी पडलेल्या जॉर्ज फ्लॉइड यांच्या नावाची मुखपट्टी घातली होती. ‘‘फ्लॉइड यांच्यासोबत घडलेला प्रसंग हा अतिशय दु:खाचा आहे. मी त्यांच्या नावाची मुखपट्टी घातल्याने फ्लॉइड यांच्या जाण्याचे दु:ख कमी होणार नसले तरी वर्णद्वेषाचा निषेध मला याद्वारे करता येणार आहे,’’ असे ओसाका म्हणाली.