झुलन गोस्वामी, भारताची वेगवान गोलंदाज

तुषार वैती

गेल्या काही वर्षांत भारतीय महिला संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, उंचावलेला आलेख सहज लक्षात येईल. २०१७च्या विश्वचषकात भारताला विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. २०१८च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतही भारताने उपांत्य फेरीत मजल मारली होती. यावेळी भारतीय संघ चांगल्या तयारीत असून विश्वविजेतेपदाची संधी आहे, असे मत भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने व्यक्त केले. गेल्या विश्वचषकाआधीच ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या झुलनशी केलेली ही बातचीत –

* भारतीय संघबांधणीबाबत काय सांगशील?

भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य भरणा आहे. सलामीवीर शफाली वर्मा हे भारताचे भवितव्य मानले जात आहे. स्मृती मानधना हिच्यावर भारतीय फलंदाजीची मुख्य भिस्त असून तिला जेमिमा रॉड्रिग्स हिची चांगली साथ लाभत आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत आहे.

*  भारतीय संघाला यंदाच्या विश्वचषकात कितपत संधी आहे, असे तुला वाटते?

भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे. नुकत्याच आटोपलेल्या तिरंगी स्पर्धेत भारताला जेतेपदाने हुलकावणी दिली. चांगल्या तयारीनिशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. त्याचबरोबर बऱ्याच आधी ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या भारतीय खेळाडूंनी तेथील वातावरणाशी जुळवून घेतले आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांची त्यांना चांगली जाण आली आहे. माझ्या मते, जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता भारतीय संघामध्ये आहे. त्यामुळे चांगला खेळ केल्यास, भारताला विश्वचषक जिंकण्याची उत्तम संधी आहे.

*  भारताच्या मधल्या फळीची कामगिरी सध्या निराशाजनक होत आहे, याबाबत काय सांगशील?

शफाली वर्मा भारताला चांगली सुरुवात करून देत आहे. स्मृती आणि जेमिमा आपापल्या परीने संघाच्या विजयात योगदान देत आहेत. हरमनप्रीत मोठी खेळी करून संघाला सावरत आहे. पण या सर्व बाद झाल्यानंतर मधल्या फळीचे अपयश भारताला भोवत आहे. मधल्या फळीत दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती यांनी कामगिरी उंचावण्याची गरज आहे. ट्वेन्टी-२० प्रकारात खणखणीत षटकार ठोकणारे फलंदाज चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. पण छोटय़ा खेळींनी संघाला विजय मिळवून देणाऱ्या दीप्ती, वेदा यांची कामगिरी कुणालाही दिसत नाही. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. भारतीय खेळाडूंचे कच्चे दुवे हेरण्यापेक्षा त्यांना पाठिंबा, प्रोत्साहन देण्याची गरज आहे. याच खेळाडूंनी २०१७चा विश्वचषक आणि २०१८चा ट्वेन्टी-२० विश्वचषक गाजवला होता. त्यामुळे बऱ्यापैकी अनुभव गाठीशी असलेल्या भारतीय संघाला चाहत्यांनी पाठिंबा द्यावा, असे मला वाटते.

*  भारतीय संघासमोर कोणत्या बलाढय़ संघाचे प्रमुख आव्हान असेल?

महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड याच संघांची मक्तेदारी राहिली आहे. चार वेळा ट्वेन्टी-२० विश्वचषक पटकावणारा ऑस्ट्रेलिया संघ घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांना पाचव्यांदा विश्वविजेतेपदाची संधी आहे. मात्र भारतीय संघही कमी नाही. विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतरच कोणता संघ बलाढय़ आहे, हे सांगता येईल. भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल, असे मला वाटते. मात्र त्या दिवशी भारतीय संघाची कामगिरी कशी होईल, यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. अंतिम फेरी गाठणे, हे भारतीय संघाचे प्रमुख ध्येय असेल.