सुशील कुमारचे ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न भंगण्याची चिन्हे

नवी दिल्ली : जितेंदर कुमारने ७४ किलो वजनी गटाची निवड चाचणी स्पर्धा जिंकून इटली आणि नवी दिल्ली येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धासाठी भारतीय संघातील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा कुस्तीपटू सुशील कुमारचे यंदा टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत.

मातब्बर कुस्तीपटूंचा सहभाग असलेल्या ७४ किलो वजनी गटात जितेंदरने अमित धनकरचा ५-२ असा पराभव केला. या निवड चाचणी स्पर्धेतून सुशील कुमारने हाताच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. शुक्रवारी निवड चाचणी स्पर्धेत विजयी होणाऱ्या कुस्तीपटूलाच इटलीतील मानांकन कुस्ती स्पर्धा (१५ ते १८ जानेवारी), नवी दिल्ली येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत (१८ ते २३ जानेवारी) आणि शिआन येथील आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत (२७ ते २९ मार्च) सहभागी होता येईल, असे भारतीय कुस्ती महासंघाने याआधीच स्पष्ट केले आहे.

जर इटली आणि नवी दिल्ली येथील स्पर्धामध्ये कुस्तीपटूंची कामगिरी समाधानकारक झाली नाही तर आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी नव्याने निवड चाचणी लढती खेळवून कुस्तीपटूंची निवड करू. आम्हाला आमचे सर्वोत्तम कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पाठवायचे आहेत.

– ब्रिजभूषण शरण सिंग, अध्यक्ष, भारतीय कुस्ती महासंघ