राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या जितू राय याने दहा मीटर पिस्तूलमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत सुवर्णपदक मिळविले आणि ५८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. महाराष्ट्राची राही सरनोबत हिने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूलमध्ये सोनेरी कामगिरी केली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत जितू याने २०२.३ गुण नोंदविले आणि स्वत:चाच १९९.४ गुणांचा विक्रम मोडला. त्याने म्युनिच येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत हा विक्रम नोंदविला होता. जितू याने येथील स्पर्धेत ५० मीटर पिस्तूलमध्ये वैयक्तिक व सांघिक या दोन्ही क्रीडाप्रकारातही विजेतेपद मिळविले होते. शहनाझ रिझवी याने १९८.८ गुणांसह रुपेरी कामगिरी केली. कर्नाटकच्या पी.एन.प्रकाश याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने १७६ गुण नोंदविले.
कोल्हापूर येथील ऑलिम्पिकपटू राही हिने चुरशीच्या लढतीनंतर मध्यप्रदेशच्या सुरभी पाठक हिला मागे टाकून सुवर्णपदक मिळविले. तिने १७ गुण नोंदविले. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत हरयाणाचे प्रतिनिधित्व करणारी पुण्याची खेळाडू अनीसा सय्यद हिने टायब्रेकरद्वारा श्रेया गावंडे हिला हरविले.