राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करणारा जितू राय झंझावाती फॉर्ममध्ये आहे. भारतीय लष्कराचा शूर योद्धा असणाऱ्या जितूला आपल्या बढतीसाठी बोलताना चक्क लाज वाटते. कर्तृत्त्व नसतानाही बढतीसाठी वेगवेगळे अयोग्य मार्ग पत्करण्याच्या पद्धती विकसित झालेल्या असताना जितूचा विनय अनोखा असा आहे.
‘भारतीय लष्कराने मला गेल्याच वर्षी कामगिरी लक्षात घेऊन मला दोन पदांची बढती दिली. त्यासाठी मी भारतीय लष्कराचा ऋणी आहे. लागोपाठ दोन सुवर्णपदके पटकावल्यामुळे पुन्हा बढतीसाठी बोलताना लाज वाटते’, असे जितू प्रांजळपणे सांगतो. ११व्या गुरखा रेजिमेंटमध्ये नायब सुभेदारपदी कार्यरत असणाऱ्या जितू रायला गेल्यावर्षी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केल्याबद्दल बढती देण्यात आली होती.
त्याने पुढे सांगितले, ‘भारतीय लष्कराशिवाय ही वाटचाल शक्यच नव्हती. लष्कराने मला लागणारी प्रत्येक सुविधा पुरवली आहे. आणि माझी कोणतीही तक्रार नाही. नेपाळमध्ये शेती करणारा मुलग्याचा इथपर्यंत झालेला प्रवास अफलातून असा आहे. मी याची कल्पनाच केली नव्हती. या सगळ्यासाठी भारतीय लष्कराचा मी ऋणी आहे’.
‘राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक अधिक समाधान देणारे आहे. राष्ट्रकुलच्या तुलनेत आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मी कसून मेहनत केली होती’, असे जितूने सांगितले. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावल्यानंतरही १० मीटर एअर पिस्तूल प्रकारच आवडता असल्याचे जितूने सांगितले.
म्युनिच येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात जितूने रौप्य तर मारिबोर येथे झालेल्या विश्वचषकात त्याने १० मी एअर पिस्तूल प्रकारातच सुवर्णपदकाची कमाई केली होती. इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही १० मी एअर पिस्तूल सांघिक प्रकारात खेळताना जितूने कांस्यपदक पटकावले होते.  ग्रॅनडा, स्पेन येथे झालेल्या नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत जितूने रौप्यपदकावर नाव कोरले होते. पुढच्या महिन्यात होणाऱ्या विश्वचषकात चांगली कामगिरी करायची आहे असे जितूने सांगितले.