दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी नेमबाज जितू रायने १० मी एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. जितू रायने २१६.७ गुणांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले, तर जपानच्या टोमोयुकी मत्सुदा याने २४०.१ गुणांसह सुवर्णपदाकाला गवसणी घातली. व्हिएतनामच्या सुआन विन होआंग २३६.६ गुणांसह रौप्य पदकाचा मानकरी ठरला. स्पर्धेच्या दुसऱया फेरीत जितूच्या निराशजनक कामगिरीमुळे तो पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाईन अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, जितूला नशिबाची साथ मिळाली. प्रतिस्पर्धी खेळाडूंकडूनही दुसऱया फेरीत अपेक्षित कामगिरी झाली नाही. अखेरीस जितूला तिसरे स्थान मिळाले आणि कांस्यपदकावर शिक्कामोर्तब झाले.

भारताकडून जितूसह ओमकार सिंग आणि अमनप्रीत सिंग देखील स्पर्धेत सहभागी होते. मात्र, त्यांना पहिल्या आठ खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त करण्यात अपयश आले आणि पदकाच्या शर्यतीत ते सामील होऊ शकले नाहीत. जितूने प्राथमिक फेरीत सहाव्या स्थानासह पदकासाठीच्या शर्यतीसाठी पात्रत सिद्ध केली. ओमकार सिंग आणि अमनप्रीत सिंग यांना पहिल्या फेरीत अनुक्रमे १४ वे आणि १९ वे स्थान मिळाले.
तत्पूर्वी, सोमावारी जितू रायने महिला नेमबाज हिना सिंग हिच्यासोबत मिश्र जोडीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. जितू राय आणि हिना सिंग यांनी मिश्र प्रकारातील १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम लढतीत जपानच्या जोडीचा पराभव केला होता.