आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने नोकरीचा मुद्दा महत्त्वाचा आहे, म्हणूनच मुंबईतील स्थानिक क्रिकेटपटूंच्या नोकऱ्यांच्या मुद्याला प्राधान्य असेल असे ‘क्रिकेट फर्स्ट’ गटाने स्पष्ट केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून, त्यादृष्टीने विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या ‘क्रिकेट फर्स्ट’ गटाने प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील ऑफिस क्रिकेट आणि क्लब क्रिकेटमधीस समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एमसीए निवडणुकीत बहुमत मिळाले तर ऑफिस क्रिकेटला अग्रक्रम देऊ, असे क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रमुख विजय पाटील यांनी सांगितले.
‘‘एमसीएमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत होण्यापूर्वीच डी.वाय.पाटील संघ स्थापन करून अनेक क्रिकेटपटूंना आपल्या संघात सामावून घेतले आहे, असेच धोरण एमसीएमध्येही राबवण्यासाठी प्रयत्शील आहोत,’’ असे पाटील यांनी सांगितले.
सध्या काही कंपन्या आणि कार्यालये हंगामी तत्त्वावर खेळाडूंना नोकऱ्या देतात, परंतु कायमस्वरुपी नोकऱ्यांचा प्रश्न ज्वलंत असल्याच्या मुद्यावर या कार्यक्रमात सविस्तर चर्चा झाली.