भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने इतिहास रचला आहे. जो रूट इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. जो रूटने माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला मागे टाकले. कूकने १५,७३७ धावा केल्या होत्या. जो रूटने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले आणि त्याने कूकच्या विक्रमाला मागे टाकले. त्याने नॉटिंगहॅममध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीचे ५०वे अर्धशतकही पूर्ण केले.

जो रूट इंग्लंडसाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळतो. त्याने ३६६ डावांमध्ये कूकला मागे टाकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कूकने एकूण ३६ शतके आणि ९० अर्धशतके केली आहेत. पहिल्या डावात रूटने ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. मुंबईकर गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याला पायचित पकडले.

 

 

 

रूटची भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी

जो रूटने इंग्लंडसाठी १०६ कसोटी, १५२ एकदिवसीय आणि ३२ टी-२० सामने खेळले आहेत. ३० वर्षीय रूटने भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. त्याने भारताविरुद्ध २१ कसोटीत १८३४ धावा केल्या आहेत आणि या काळात त्याने ५ शतके आणि १० अर्धशतके ठोकली आहेत.

हेही वाचा – भिडल्या… लढल्या! अटीतटीच्या झुंजीत अर्जेंटिनाचा विजय; भारताची आता कांस्यपदकावर नजर

जो रूटने २०१२मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. यॉर्कशायरचा हा खेळाडू लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये नाव कमावणार, असे म्हटले जात होते. १३ वर्षांचा असताना त्याला इंग्लंडचा भावी कर्णधार म्हटले गेले होते.