न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटने विक्रमी कामगिरी केली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडने केलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने कर्णधार जो रुटचं द्विशतक आणि रोरी बर्न्सच्या शतकाच्या जोरावर ४७६ धावांपर्यंत मजल मारली. जो रुटने ४४१ चेंडूचा सामना करत २२६ धावा केल्या. त्याच्या खेळीत २२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या कामगिरीसोबत जो रुट न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पाहुण्या संघाचा पहिला कर्णधार ठरला आहे.
जो रुटच्या या विक्रमी खेळीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात १०१ धावांनी आघाडी मिळाली आहे. मात्र या कसोटी सामन्यात पावसामुळे काही दिवस खराब झाल्यामुळे हा सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकत चालला आहे. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचे सलामीवीर माघारी परतले आहेत. मात्र कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरने भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. चौथ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २ गड्यांच्या मोबदल्यात ९६ धावांपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंड अद्यापही ५ धावांनी पिछाडीवर आहे, त्यामुळे अखेरच्या दिवसात न्यूझीलंडचे फलंदाज कसा खेळ करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
न्यूझीलंडकडून पहिल्या डावात गोलंदाजीत नील वँगरने ५ बळी घेतले. न्यूझीलंड या कसोटी मालिकेत आघाडीवर असल्यामुळे इंग्लंडला या सामन्यात बाजी मारायची असल्यास गोलंदाजांना अखेरच्या दिवशी कष्ट घ्यावे लागणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2019 12:49 pm