भारताविरूद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्यानंतर इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट याने बॅट हातातून सोडून दिली होती. आपल्या या कृत्याचा पश्चाताप वाटतोय अशी प्रतिक्रिया रुटने दिली आहे. जो रुटने शतकानंतर बॅट हातातून सोडून देण्याच्या कृत्यावर क्रिकेटविश्वातून आणि सोशल मीडियातून टीका होत होती, त्यानंतर  रूटने या कृत्याचा पश्चाताप वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटच्या मैदानावर आतापर्यंत माझ्या हातून झालेली ती सर्वात लाजिरवाणी गोष्ट होती असं तो म्हणाला.

मंगळवारी हेडिंग्लेमध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात रूटने विजयी चौकार लगावत स्वतःचं शतकही पूर्ण केलं. कारकिर्दीतील १३ व्या शतकासह मालिकाही खिशात टाकल्याचं सेलिब्रेशन त्याने काहीशा वेगळ्या पद्धतीने केलं. विजयी फटक्यानंतर त्याने हातातील बॅट मैदानावर टाकली, पण त्याचं हे सेलिब्रेशन क्रिकेट चाहत्यांच्या आणि माजी खेळाडूंना आवडलं नाही. सामन्यानंतर लगेचच त्याच्या या कृत्यावर टीका व्हायला सुरूवात झाली होती. इंग्लंडचाच कर्णधार इयॉन मॉर्गन यालाही तो प्रकार आवडला नव्हता.

भारताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वन-डे सामन्यात कर्णधार मॉर्गन आणि जो रुट यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवून मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. भारताने दिलेले २५७ धावांचे आव्हान इंग्लंडने ८ गडी राखून पूर्ण केले.