नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा इंग्लंडचा निर्णय पहिल्या सत्रात तरी सपशेल अपयशी ठरला. परंतु जो रूटने झुंजार शतकी खेळी साकारून गॅरी बॅलन्सला साथील घेत इंग्लंडच्या डावाला स्थिरता दिली. त्यामुळेच अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने ७ बाद ३४३ अशी मजल मारली. खेळ थांबला तेव्हा मोईन अली २६ धावांवर खेळत होता, तर स्टुअर्ट ब्रॉडने आपले खाते उघडले नव्हते.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर त्यांची ३ बाद ४३ अशी केविलवाणी अवस्था झाली. सलामीवीर अ‍ॅलिस्टर कुक (२०), अ‍ॅडम लिथ (६) आणि इयान बेल (१) खेळपट्टीवर फार तग धरू शकले नाहीत. मिचेल स्टार्कने ज्या षटकात बेलला तंबूची वाट दाखवली, त्याच षटकात इंग्लंडचा चौथा फलंदाजसुद्धा बाद होणार होता. पण रूटचा झेल यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनला झेलता आला नाही. या जीवदानाचा फायदा घेत मग रूटने इंग्लिश संघाला आशादायी मार्ग दाखवला. रूट आणि बॅलन्स (६१) यांनी चौथ्या विकेटसाठी १५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर रूटने बेन स्टोक्सच्या (५२) साथीने पाचव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. रूटने सुमारे चार तास किल्ला लढवताना १७ चौकारांसह १३४ धावा केल्या. मिचेल स्टार्कने तीन आणि जोश हॅझलवूडने दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ८८ षटकांत ७ बाद ३४३ (जो रूट १३४, गॅरी बॅलन्स ६१, बेन स्टोक्स ५२; मिचेल स्टार्क ३/८४,
जोश हॅझलवूड ३/७०)