भारताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वन-डे सामन्यात कर्णधार मॉर्गन आणि जो रुट यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवून मालिका २-१ च्या फरकाने जिंकली आहे. भारताने दिलेले २५७ धावांचे आव्हान इंग्लंडने ८ गडी राखून पूर्ण केले.

या सामन्यात जो रूट याने आपल्या फलंदाजीचा दर्जा भारतीय गोलंदाजाना दाखवून दिला. गेल्या काही सामन्यांमध्ये ‘मिस्ट्री’ गोलंदाज म्हणून नाव कमावलेल्या कुलदीप यादवलाही त्याने अचूक पद्धतीने खेळून काढले आणि योग्य वेळी फटके मारले. रूटने संयमी फलंदाजी करत १२० चेंडूत १०० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १० चौकार खेचले आणि विजयी फटकाही स्वतः खेळला. हा फटका खेळल्यानंतर मात्र त्याने एका वेगळ्याच पद्धतीने सेलिब्रेशन केले. त्याने सामना संपल्यानंतर बॅट मैदानावर टाकली आणि ‘मी माझी कामगिरी फत्ते केली’, असा आशयाच्या भावना व्यक्त केल्या.

हा पहा व्हिडिओ –

रूटच्या या ‘बॅट ड्रॉप’ सेलिब्रेशनची ट्विटर आणि इतर समाज माध्यमांत जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ २५६ धावा केल्या. हे लक्ष्य इंग्लंडच्या फलंदाजांची फारसे अवघड नव्हते. पण इंग्लंडचे दोनही सलामीवीर ठराविक अंतराने माघारी परतले. त्यानंतर जो रुट आणि इयॉन मॉर्गन यांच्यावर संघाची मदार होती. या दोन अनुभवी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना केला. भारताने कमी धावसंख्येचे आव्हान दिल्यामुळे दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी न करता भागीदारी रचण्यावर भर दिला. या भागीदारीच्या जोरावर दोन्ही फलंदाजांनी भारताला सामन्यात बॅकफूटवर ढकलत तिसऱ्या विकेटसाठी १८६ धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.