Bio Security नियमांचा भंग केल्याप्रकरणी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात संघातलं स्थान गमावलेल्या जोफ्रा आर्चरवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कारवाई केली. आर्थिक दंड आणि सक्त ताकीद दिल्यानंतर आर्चर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. साऊदम्पटन कसोटी सामना गमावल्यानंतर यजमान इंग्लंडकडे मँचेस्टर कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची संधी होती. परंतू तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यामुळे इंग्लंडला विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

आर्चरने नेमकं केलं तरी काय??

साऊदम्पटन कसोटी सामना संपल्यानंतर इंग्लंडचा संघ मँचेस्टरकडे रवाना झाला होता. या प्रवासादरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंना क्रिकेट बोर्डाने विशेष कारची सोय करुन दिली होती. प्रवासादरम्यान खेळाडूंना कुठेही न थांबण्याच्या सूचना देऊन त्यांच्यासाठी विशेष पेट्रोल पंप आणि जेवणासाठी Bio Secure काऊंटी मैदानाची सोय करण्यात आली होती. मात्र सक्त ताकीद दिल्यानंतरही जोफ्रा आर्चर मँचेस्टरदरम्यान आपल्या घरी गेला. इंग्लंड क्रिकेट संघाच्या प्रशासनाला ही बाब समजल्यानंतर त्याला दुसऱ्या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आलं. तसेच तातडीने आर्चरला क्वारंटाइन होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

दरम्यान जोफ्रा आर्चरने आपली चूक मान्य करुन आपला गुन्हा मान्य केला. अशी चूक पुन्हा होणार नाही याची खात्री दिल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आर्चरला ३० हजार पाऊंडचा दंड आणि लिखीत हमी या जोरावर त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची परवानगी दिली आहे.