एरव्ही खेळाडू मैदानावर घाम गाळून आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र करोनामुळे संपूर्ण जग संकटात असताना हेच खेळाडू पोलीस म्हणून कर्तव्य बजावत आहेत. पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या खेळाडूंनी थेट रस्त्यावर उतरून करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन के ले आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता बॉक्सर अखिल कुमार आणि एशियाड विजेत्या संघातील कबड्डीपटू अजय ठाकूर हे पोलीस दलात कार्यरत आहेत.

‘‘२००७ पासून मी उपअधिक्षक पदावर कार्यरत आहे. पोलीस म्हणून मी माझ्या कार्यकाळात विविध आव्हानांना सामोरे गेलो आहे. सध्या हिस्सार येथे सकाळी सहा वाजल्यापासून माझ्या कामाला सुरुवात होते. गस्त घालत लोकांना घरी बसण्याचे आवाहन आम्ही करत असतो. फक्त औषधासारखी जीवनावश्यक वस्तू आणण्याची कामे करणाऱ्यांना आम्ही सहकार्य करतो,’’ असे हरयाणा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या जोगिंदरने सांगितले.

गुरग्राम पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या अखिलने सांगितले की, ‘‘करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सद्यस्थितीत जी संचारबंदी लागू करण्यात आली आहे ती योग्य आहे. जीवनावश्यक वस्तू मिळत असल्याने लोकांनी काळजी करण्याचे कारण नाही.’’

कबड्डी खेळाडू अजय ठाकूर सध्या हिमाचल प्रदेशातील पोलीस दलात कर्तव्य बजावत आहे. ‘‘रस्त्यावर उगाचच गर्दी करणाऱ्या युवा मंडळींच्या पालकांनाच जाऊन आम्ही समज देतो. कारण युवा मंडळींचे पालक हेच त्यांच्या मुलांना समजावू शकतात. काही जण जाणूनबुजून पोलिसांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, मग अशा मंडळींशी आम्हाला कठोर वागावे लागते,’’ असे अजय ठाकूरने सांगितले.