केमार रोचने आपला वाढदिवस वेस्ट इंडिजच्या रोमहर्षक विजयानिशी साजरा केला. तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील भारताविरुद्धच्या थरारक सामन्यात वेस्ट इंडिजने एक विकेट राखून विजय मिळवत आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.
भारताच्या २३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची चांगलीच दमछाक झाली. परंतु सलामीवीर फलंदाज जॉन्सन चार्ल्सने ९७ धावांची झुंजार खेळी उभारल्यामुळे वेस्ट इंडिजला १४ चेंडू राखून हा विजय साकारता आला.
दोन सामन्यांत नऊ गुण कमावणाऱ्या वेस्ट इंडिजला अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची चांगली संधी आहे. रोचने आधी गोलंदाजीत कर्तृत्व दाखवताना शिखर धवन आणि सुरेश रैना हे महत्त्वाचे बळी घेतले. त्यानंतर नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत नाबाद १४ धावांची खेळी करीत संघाला जिंकून दिले. उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेग फटका खेळून रोचनेच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.