आंतरराष्ट्रीय कारकीर्दीदरम्यान आणि निवृत्तीनंतर बहुतांश वेळा नैराश्याचा सामना करूनही आपण संघर्ष कायम राखला, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने मंगळवारी दिली.

३८ वर्षीय जॉन्सनने २०१८मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. परंतु या दरम्यान अनेकदा त्याला नैराश्याचा सामना करावा लागला. त्याशिवाय कारकीर्दीतून निवृत्त झाल्यावरही नैराश्याविरुद्धचा लढा सुरूच असल्याचे त्याने सांगितले.

‘‘संपूर्ण कारकीर्दीदरम्यान मी फक्त नैराश्याला सामोरा गेलो आहे. यामधून मी स्वत:ला कसे सावरले, हे मलाच ठाऊक आहे. किंबहुना क्रिकेटपासून दुरावल्यानंतरही माझा संघर्ष कायम आहे,’’ असे जॉन्सनने एका ऑस्ट्रेलियन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. जॉन्सनपूर्वी ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल, विल पुस्कोव्हस्की आणि निक मॅडिन्सन या क्रिकेटपटूंना नैराश्य अथवा मानसिक आरोग्याच्या समस्येने छळले होते.

‘‘अनेकदा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता होती. निवृत्तीच्या निर्णयानंतर मला अचानक नैराश्याला सामोरे जावे लागले. या दरम्यान मला कुटुंबीयापासून दूर राहण्याची इच्छा व्हायची. अशा काळात तुमचा तुमच्या मनावर ताबा राहत नाही आणि अनेक वाइट सवयींचीही तुम्हाला लागण होते. त्यामुळे तो काळ माझ्यासाठी फारच क्लेशकारक होता,’’ असेही जॉन्सनने सांगितले.