भारत विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक परदेशी पाहुण्याला हा देश, इथली माणसं हळूहळू आपलीशी वाटू लागतात. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्सही या लोकांमधील एक आहे. भारतावरच्या त्याच्या प्रेमापोटी जॉन्टीने आपल्या मुलीचे नावही ‘इंडिया’ ठेवले आहे. जाँटीची मुलगी ‘इंडिया’ हिचा जन्म मुंबईत झाला त्यामुळे त्याने तिचं नाव इंडिया ठेवलं, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर आता जॉन्टी ऱ्होड्सने एक व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा आपलं भारतावर आणि भारतीयांवर इतकं प्रेम का आहे त्याचं उत्तर दिलं आहे.

जॉन्टी ऱ्होड्सने एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. करोनामुळे संशयित आणि बाधित असलेल्या लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलं जातं. या व्हिडीओमध्ये अशीच काही क्वारंटाइन सेंटरमधील लोकं आहेत. विशेष म्हणजे ते लोक चक्क क्रिकेट खेळताना दिसत आहेत. क्वारंटाइन सेंटरमध्ये रंगलेल्या सामन्याचा व्हिडीओ पोस्ट करून जॉन्टी कॅप्शन लिहिले आहे. ‘लोक मला नेहमी विचारतात की तुला भारताबद्दल इतकं प्रेम का? हा व्हिडीओ पाहून मला या प्रश्नाचं वेगळं उत्तर देण्याची गरज नाही’, असे जॉन्टी ऱ्होड्सने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही हाच व्हिडीओ बुधवारी  ट्विट केला होता. पण तो व्हिडीओ कुठला आणि कधीचा याबाबत काही माहिती देण्यात आली नव्हती.

दरम्यान, करोनाच्या तडाख्यामुळे मैदानावरील क्रिकेट सुमारे तीन महिन्यांपासून बंद आहे. भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या IPL स्पर्धेला करोनाचा फटका बसला. आधी २९ मार्च आणि नंतर १५ एप्रिलला नियोजित असलेली IPLस्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. IPL चे आयोजन याच वर्षात करण्यासाठी BCCI कडून सर्व प्रकारच्या पर्यायांची चाचपणी सुरू आहे. जरी प्रेक्षकांविना सामने खेळवण्याची वेळ आली तरीही चालेल. चाहते, संघ व्यवस्थापन, खेळाडू, ब्रॉडकास्टर्स, प्रायोजक आणि समभागधारक सारेच IPL 2020 च्या आयोजनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. IPL मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी मधल्या काळात IPL खेळण्याबाबत उत्सुक असल्याचे म्हटले होते. आम्ही आशावादी आहोत. BCCI लवकरच IPL च्या आयोजनासंदर्भात निर्णय घेईल, अशी माहिती BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे.