माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगचा अन्य संघांना धोक्याचा इशारा

मेलबर्न : इंग्लंडने विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ खेळाडूंमध्ये अनेक विजयवीरांचा समावेश असला तरी जोस बटलरपासून इतर संघांनी सावध राहावे, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने दिला आहे.

३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेशी सलामीचा सामना रंगणार आहे. विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या संघाविषयी पाँटिगला विचारले असता तो म्हणाला, ‘‘इंग्लंडचा जोस बटलर हा अन्य संघासाठी धोकादायक ठरू शकतो. गेल्या दोन-तीन वर्षांत बटलर फार प्रगल्भ झाला असून मी त्याची प्रगती जवळून पाहिली आहे. काही वर्षांपूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावताना बटलरला मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळाली होती.’’

‘‘गेल्या १२ ते १८ महिन्यांत त्याने ट्वेन्टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी अशा सर्वच प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. मुख्य म्हणजे इंग्लंडचे संघ व्यवस्थापन त्याला एकदिवसीय सामन्यात सलामीवीर ते पाचवा क्रमांक असे कोणत्याही स्थानावर फलंदाजीला पाठवूनदेखील तो सातत्याने धावा करत आहे. त्यामुळेच यंदा इंग्लंडसाठी बटलरच सर्वाधिक महत्त्वपूर्ण खेळाडू असेल,’’ असेही विश्वविजेता कर्णधार पाँटिंगने सांगितले.

‘‘याव्यतिरिक्त बेन स्टोक्स, मोईन अली यांसारखे अष्टपैलू खेळाडू अनुक्रमे सहाव्या, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्यामुळे इंग्लंडची फलंदाजी अधिक खोलवर पसरली आहे. म्हणून यावेळी घरच्या चाहत्यांसमोर खेळणाऱ्या इंग्लंडला पराभूत करण्यासाठी सर्वच संघांना अथक परिश्रम करावे लागणार आहेत,’’ असे पाँटिंगने नमूद केले.