इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर हा दोन-तीन वेळा क्रीझ सोडून पुढे येत होता व त्याबद्दल त्याला समजही दिली होती. मात्र त्याने ही गोष्ट चेष्टेवारी नेल्यामुळे मी त्याला धावचीत केले, असे श्रीलंकेचा गोलंदाज सचित्रा सेनानायके याने सांगितले.
या दोन संघांमधील पाचव्या एकदिवसीय सामन्यात सेनानायके याने बटलर याला धावचीत केले. सहकारी फलंदाजाने चेंडू तटविण्यापूर्वीच बटलर हा नॉनस्ट्रायकरचे क्रीझ सोडून पुढे गेल्यानंतर सेनानायके याने यष्टी उडविली व पंचांकडे दाद मागितली. पंचांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमावलीनुसार बटलर हा बाद असल्याचा निर्णय दिला.
या संदर्भात सेनानायकेने आपल्या कृत्याचे समर्थन करताना सांगितले की, ‘‘बटलर हा अनेक वेळा क्रीझ सोडून पुढे येत होता. त्याबद्दल मी त्याला बाद करीन असेही सांगितले होते. मात्र तरीही त्याने माझे ऐकले नाही. त्याला बाद करण्यात मी कोणतीही चूक केलेली नाही.’’
पंचांनी श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला सेनानायके याने केलेले अपील मागे घ्यायचे आहे काय, असे विचारले असता मॅथ्यूजने सेनानायके याच्या कृत्याचे समर्थन केले. त्यामुळे पंचांनी बटलर हा बाद असल्याचा निर्णय दिला. मॅथ्यूज म्हणाला, ‘‘केवळ या सामन्यात नव्हे तर चौथ्या सामन्यातही अनेक वेळा बटलर याने क्रीझ सोडले होते. त्यावेळीही त्याला मी समजावून सांगितले होते.’’
इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कूकने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘या कृत्यानिशी श्रीलंकेच्या खेळाडूंनी अखिलाडूवृत्ती दाखवली आहे. त्याचा परिणाम दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’