आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) बंदी घातलेल्या इंडोनेशिया फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी जोस मॉरिन्हो यांच्या नियुक्तीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चेल्सीचे माजी प्रशिक्षक मॉरिन्हो यांनी इंडोनेशियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळावी यासाठी क्रीडा मंत्री इमाम नाहरावी यांनी प्रयत्न सुरू केले आहे. मॉरिन्हो यांनी प्रशिक्षकपद स्वीकारावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे इंडोनेशिया संघाला गेल्या मे महिन्यात फिफाने निलंबित केले आहे.

मॉरिन्हो यांची डिसेंबर महिन्यात चेल्सीच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर विविध क्लबशी त्यांचे नाव जोडले जात होते. त्यामध्ये मँचेस्टर युनायटेडचे नाव आघाडीवर होते. लुईस व्हॅन गाल यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेडला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे आणि त्यामुळे त्यांच्या हकालपट्टीची मागणीही जोर धरत आहे. या पदावर मॉरिन्होंच्या नावाची चर्चा आहे, परंतु मॉरिन्हो इंडोनेशिया संघाला मार्गदर्शन करतील, असा विश्वास नाहरावी यांनी व्यक्त केला. ‘‘या संदर्भात अध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी चर्चा केली आहे. मॉरिन्हो यांची समजूत काढणे, ही सोपी गोष्ट नाही,’’ असे नाहरावी म्हणाले.