तीन एकदिवसीय सामन्याची मालिका ऑस्ट्रेलियानं २-१ च्या फरकानं जिंकली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं यजमान ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीला शतक झळकावता आलं नाही. मात्र दोन अर्धशतकासह सन्माजनक धावा केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडसमोर नांगी टाकताना दिसतोय.

जोश हेजलवूडनं २०२० मध्ये विराट कोहलीला सलग चार वेळा बाद करण्याची किमया साधली आहे. तीन एकदिवसीय सामन्यात तिन्हीवेळा हेजलवूडनेच विराटला बाद केलं आहे. एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला लागोपाठ चार वेळा बाद करणारा हेजलवूड पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी २०१३ मध्ये पाकिस्तानच्या जुनैद खान यानं, २०१९ ऑस्ट्रेलियाच्या रिचर्डसन यानं आणि २०१९ मध्ये न्यूझीलंडच्या ट्रेंड बोल्डनं विराट कोहलीला प्रत्येकी तीन-तीन वेळा बाद केलं आहे.

तिन्ही सामन्यात विराट कोहली उसळत्या चेंडूवर बाद झाला आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात हेजलवूडनं कोहलीला आतापर्यंत ५४ चेंडू फेकले आहेत. त्यामध्ये ३५ धावा देत ४ वेळा विराट कोहलीला बाद केलं आहे. हेजलवूडसमोर विराट कोहलीची बॅट शांत राहत असल्याचं या आकडेवारीवरुन दिसतेय. १९ जानेवारी २०२० रोजी बंगळुरुमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात हेजलवूडनं पहिल्यांदा कोहलीला बाद केलं होतं. करोना विषाणूच्या काळात क्रिकेट बंद होतं. करोना विषाणूच्या नियमात राहून क्रिकेट सुरु झालं आहे. त्यानंतर आता पहिल्या तिन्हीही सामन्यात विराट कोहलीला हेजलवूडनं बाद करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.