राष्ट्रकुलच्या दहावा दिवशी भारताला एकमेव सुवर्ण मिळाले असले तरी हे पदक ऐतिहासिक ठरले. दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पा जोडीने भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॉशमधले पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले. शरथ कमाल आणि अँथनी अमलराज जोडीने रौप्यपदकाची कमाई केली. बॉक्सर लैश्राम सरिता देवी आणि लैश्राम देवेन्द्रो भावंडांनी रौप्यपदक नावावर केले. अ‍ॅथलेटिक्समध्ये सीमा पुनियाने रौप्यपदकावर कब्जा केला. बॉक्सर पिंकी जांगराला आणि बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकाची दावेदार असणाऱ्या पी.व्ही.सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सकीना खातुनने पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदकाची नोंद केली. भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक मारत पदक पक्के केले.
अन्य खेळांना मिळणारी प्रसिद्धी, ग्लॅमर आपल्या खेळाला मिळत नसले तरी त्या क्लेशदायक आठवणींमध्ये रमण्यापेक्षा इतिहास लिहिणारे हात शांत बसत नाहीत. गुणवत्ता तर असतेच, पण त्याला जिद्द, चिकाटी, अथक मेहनतींचे कोंदण लावत ते आपल्या दैदीप्यमान कामगिरीच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद करतात. स्क्वॉश हा खेळ भारतीयांकडून दुर्लक्षित असाच, पण तरीही दीपिका पल्लिकल व जोश्ना चिनप्पा या महिला जोडीने प्रयत्नांची शर्थ करत सुवर्णपदक खेचून आणले आणि सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला. सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दीपिका आणि जोश्ना यांनी स्क्वॉशच्या महिला दुहेरीमध्ये सुवर्णपदकांची कमाई करत भारतीयांचे डोळ्यांचे पारणे फेडले. भारताला या खेळात मिळालेले हे पहिलेच पदक आहे.
दीपिका व जोश्ना यांनी महिलांच्या दुहेरीत इंग्लंडच्या लौरा मसारो व जेनी डुंकाल्फ यांना सरळ दोन गेम्समध्ये पराभूत केले, त्यांनी हा सामना ११-६, ११-८ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडी २-७ अशा पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ करीत आघाडी मिळविली व शेवटपर्यंत टिकविली. भारतीय जोडीला पाचवे मानांकन देण्यात आले होते. पण कसलेही दडपण न घेता या दोघींनी विजेतेपद पटकावले.
टेबल टेनिस
शरथ कमाल-अँथनी अमलराजला रौप्य
अचंथा शरथ कमाल आणि अँथनी अमलराज जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत सिंगापूरच्या निंग गाओ आणि ह्य़ू लि जोडीने शरथ-अमलराज जोडीवर ३-१ अशी मात केली. सिंगापूरच्या जोडीने ही लढत ८-११, ११-७, ११-९, ११-५ अशी जिंकली. दुहेरी प्रकारात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी शरथला पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावण्याची संधी आहे.
बॉक्सिंग
देवेन्द्रो, सरिताला रौप्यपदक ; पिंकी जांगराला कांस्य
देवेन्द्रो लैश्राम आणि लैश्राम सरिता देवी या बॉक्सिगपटूंची सुवर्णपदक पटकावण्याची संधी थोडक्यात हुकली आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र अंतिम फेरीत धडक मारत विजेंदर सिंगने सुवर्णपदकाचे स्वप्न जिवंत ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या शेली वेल्ट्सने ५७ ते ६० किलो वजनी गटातून खेळताना सरिता देवीवर मात केली तर नॉथर्न आर्यलडच्या पॅडी बार्न्सने लाइट फ्लाय ४९ किलो वजनी गटातून खेळताना देवेन्द्रोवर विजय मिळवला. विजेंदर याने ७५ किलो गटात उत्तर आर्यलडच्या कॉनोर कायोल याच्यावर ३-० अशी मात केली. त्याने या लढतीमधील पहिल्या फेरीत १०-९, दुसऱ्या फेरीतही १०-९ व पुन्हा तिसऱ्या फेरीत १०-९ असे गुण मिळविले. मनदीप जांगरा याने ६९ किलो गटात अंतिम फेरी गाठली. त्याने कॉनोर याचा सहकारी स्टीव्हन डोनेली याच्याविरुद्ध रोमहर्षक विजय मिळविला. पहिल्या फेरीत तो ९-१० असा पिछाडीवर होता. दुसऱ्या फेरीत त्याने १०-९ अशी आघाडी घेत आपले आव्हान राखले. तिसऱ्या फेरीत त्याने पुन्हा १०-९ असे गुण मिळवित लढत जिंकली. भारताच्या पिंकी जांगराला मात्र उत्तर आर्यलडच्या मिशेला वेल्श हिच्याविरुद्ध उपांत्य फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
अ‍ॅथलेटिक्स
थाळीफेकीत सीमा पुनियाला रौप्यपदक
भारताच्या सीमा अंतिल-पुनिया हिने थाळीफेकीत रौप्यपदक मिळवित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पदकाची कमाई केली. मात्र तिची सहकारी व गतविजेती कृष्णा पुनिया हिला या क्रीडाप्रकारात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. सीमा हिने चौथ्या प्रयत्नात ६१.६१ मीटपर्यंत थाळीफेक केली. पहिल्या तीन प्रयत्नात तिने अनुक्रमे ५३.६४ मीटर, ५८.८७ मीटर, ५८.६२ मंीटर अशी कामगिरी केली होती. तिने २००६ मध्ये मेलबर्न येथील राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते, तर २०१० मध्ये तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. सीमाने सलग तीन स्पर्धामध्ये पदकांची कमाई केली होती. कृष्णाने नवी दिल्ली येथील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
पॉवरलिफ्टिंग
सकिनाला कांस्य
कर्नाटकच्या सकिना खातून हिने महिलांच्या लाइटवेट पॉवरलिफ्टिंग (६१ किलोपर्यंत) प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. सकिना हिने ८८.२ किलो वजन उचलत कांस्यपदक मिळवले. नायजेरियाच्या इस्थेर ओयेमा हिने १३६ किलो वजनासह सुवर्ण तर इंग्लंडच्या नताली ब्लॅक हिने १००.२ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले. सकिना हिने राष्ट्रकुल स्पर्धेच्या १०व्या दिवशी भारताला पहिले पदक मिळवून दिले.