जोश्ना चिनप्पा व दीपिका पल्लिकल यांनी आपल्यातील जुने मतभेद विसरून देत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. इन्चॉन येथे गेल्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकमेकांविरुद्ध लढल्यानंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.
आशियाई स्पर्धेत दीपिकाने जोश्नावर मात केली होती. तेव्हापासून त्या दोघी एकमेकांना टाळत होत्या; पण त्यांनी हे मतभेद दूर करीत दुहेरीत एकत्र खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडीने भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या स्क्वॉशमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. याबाबत जोश्ना म्हणाली की, ‘‘आम्ही एकाच शहरात राहत असल्यामुळे एकमेकांना टाळणे अशक्य आहे व देशाला आपल्या जोडीची गरज आहे असे आमच्या लक्षात आले. केवळ दुर्दैवाने आम्हाला आशियाई स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळावे लागले होते. आम्ही एकत्र आलो तर दुहेरीत अनेक विजेतेपदे मिळवू शकतो, याचीही जाणीव आम्हाला झाली. कॅनडातील स्पर्धेच्या वेळी आम्ही दोघी सहभागी झालो होतो. तेथे दीपिका माझ्याशी संवाद साधण्यासाठी आली आणि तेव्हाच आमच्यातील मतभेद इतिहासजमा झाले.’’