कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

सूर्यापेठ (तेलंगणा) येथे चालू असलेल्या ४७व्या कुमार-कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची वाटचाल भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) संघाने रोखली. मुलींमध्ये ‘साइ’ने महाराष्ट्राला ३८-३२ असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली, तर मुलांमध्ये उपांत्यपूर्व फेरीत ‘साइ’ने महाराष्ट्राचा ६३-२३ असा धुव्वा उडवला.

मुलींच्या चुरशीच्या उपांत्य लढतीत ‘साइ’ने पहिला लोण देत विश्रांतीला १९-१५ अशी आश्वासक आघाडी घेतली होती. उत्तरार्धात सावध खेळ करीत ती आपल्या हातून निसटणार नाही, यांची पूर्ण काळजी घेत सहा गुणांनी विजय साकारला. हरजितसिंग कौर, मानसी रोडे, समृद्धी कोळेकर या चढाईपटूंनी आपली कामगिरी चोख पार पाडली. पण मुलांप्रमाणे मुलीसुद्धा बचावात कमी पडल्या.

महाराष्ट्राच्या मुलांचा ‘साइ’ संघापुढे निभाव लागला नाही. मध्यांतराला ३१-१४ अशी आघाडी घेणाऱ्या ‘साइ’ने नंतरदेखील तोच जोश व सातत्य कायम राखत ४० गुणांच्या मोठ्या फरकाने सामना खिशात टाकला. तेजस पाटील, आकाश रुडाले यांचा प्रतिकार कमी पडला. ‘साइ’चा बचाव तर भक्कम होताच, पण त्यांच्या आक्रमणातही धारदारपणा दिसत होता. महाराष्ट्राने सलग दुसऱ्या वर्षी ‘साइ’कडून पराभव पत्करला.