स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरील न्यायालयाच्या निर्णयानंतर आयपीएल स्पर्धेभोवती नकारात्मक वलय निर्माण झाले आहे. सट्टेबाजी आणि फिक्सिंगचे दुषण लागल्याने याआधीच विश्वासार्हता गमावलेल्या आयपीएल स्पर्धेला नजीकच्या काळात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
भारतातील बलाढ्य उद्योग समुहांपैकी एक असणाऱया जिंदाल स्टील ग्रुपने(जेएसडब्ल्यू) आयपीएलमधील संभाव्य गुंतवणुकीचा निर्णय बासनात गुंडाळला आहे. त्यामुळे आगामी काळात आयपीएलची वाटचाल चॅम्पियन्स लीगच्या दिशेने होत असल्याची ही सुरूवात आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्टील क्षेत्रातील प्रगतीनंतर ऊर्जा क्षेत्रात आपले साम्राज्य वाढविलेल्या जिंदाल स्टील उद्योगसमुहाने मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देणाऱया आयपीएल स्पर्धेतील संघ विकत घेण्याची तयारी सुरू होती. मात्र, आयपीएलला भ्रष्टाचार आणि फिक्सिंगचा काळिमा लागल्यामुळे या कंपनीने आपला इरादा बदलला आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे समभाग असलेल्या युनायटेड स्पिरिट कंपनीला विकत घेण्याची चर्चा जिंदाल स्टीलकडून सुरू होती. युनायटेड स्पिरिट ही कंपनी मद्यसम्राट विजय माल्या यांच्या अखत्यारितील आहे.
आयपीएल भोवती सध्या नकारात्मक वलय असल्याने अशा वातावरणात या स्पर्धेत कोणतीही गुंतवणूक करण्याची इच्छा नाही, असे सज्जन जिंदाल यांचा मुलगा आणि क्रिकेटमध्ये रुची असलेल्या पार्थ जिंदाल यांनी सांगितले. भ्रष्टाचार आणि फिक्सिंगचे दुषण लागलेल्या कोणत्याही स्पर्धेसोबत आमच्या ग्रुपचे नाव आम्हाला जोडायचे नाही, असेही ते पुढे म्हणाले.