News Flash

नऊ महिन्यांच्या संघर्षांनंतर ज्युल्स बिआंचीचा मृत्यू

फॉम्र्युला वन शर्यत ही जितकी आकर्षक आणि चित्तथरारक आहे, तितकीच ती धोकादायकही आहे. गतवर्षी जापनीज ग्रां. प्री. शर्यतीच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखित झाले होते

| July 19, 2015 03:18 am

फॉम्र्युला वन शर्यत ही जितकी आकर्षक आणि चित्तथरारक आहे, तितकीच ती धोकादायकही आहे. गतवर्षी जापनीज ग्रां. प्री. शर्यतीच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखित झाले होते. या शर्यतीत अपघात झालेला फ्रेंच शर्यतपटू ज्युल्स बिआंची याचा शनिवारी मृत्यू झाला. अपघातानंतर कोमात गेलेल्या बिआंचीने नऊ महिने मृत्यूशी झुंज दिली. बिआंचीच्या मृत्यूची घोषणा त्याच्या कुटुंबाने केली. बिआंची कुटुंबीयांनी त्यांच्याच घरातील एका सदस्याला १९६९मध्ये फॉम्र्युला वन शर्यतीत गमावले होते.
५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी भर पावसात पार पडलेल्या जापनीज ग्रां. प्री. शर्यतीत डनलॉप कव्‍‌र्हजवळ आंद्रियन सुटिलच्या गाडीचा अपघात झाला होता आणि त्याची कार उचलण्यासाठी सर्किटवर मोबाइल क्रेन आली होती. त्याच ठिकाणी बिआंचीचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि क्रेनच्या मागच्या बाजूला त्याची गाडी धडकली. त्या अपघातात २५ वर्षीय बिआंचीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो कोमात गेला होता.
‘‘ज्युल्सने अखेरच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झुंज दिली, परंतु आज त्याची ही झुंज संपली. त्याच्या जाण्याचे दु:ख अफाट व अवर्णनीय आहे,’’ अशी प्रतिक्रिया बिआंचीच्या कुटुंबीयांनी दिली.
नाइस शहरातील सेंटर हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या बिआंचीने शनिवारी दम सोडला. बिआंचीच्या कुटुंबीयांनी आपल्या निवेदनात म्हटले की, ‘‘रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार. त्यांनी ज्युल्सची खूप काळजी घेतली. तसेच जपानच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अपघातानंतर दाखवलेल्या तत्परतेचेही आम्ही आभार मानतो. त्याचे मित्र आणि सर्व, ज्यांनी ज्युल्सप्रति आपले प्रेम व्यक्त केले आणि कठीण प्रसंगी आमच्या सोबत उभे राहिले त्यांचेही आभार.’’
२०१३ आणि २०१४ या सत्रात बिआंचीने ३४ शर्यतींत सहभाग घेतला होता. त्याने मरुसिया संघाकडून खेळताना गतवर्षी मोनॅको ग्रां. प्री. शर्यतीत नववे स्थान पटकावून पहिला अजिंक्यपदाचा गुण पटकावला होता. ‘‘बिआंचीच्या जाण्याने आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. तो आमच्या संघात होता, हे आमचे भाग्य समजतो,’’ अशी प्रतिक्रिया मरुसिआ संघाने ट्विटरवरून दिली. या अपघातानंतर ५३ फेऱ्यांची शर्यत ४४व्या फेरीतच संपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

ज्युल्सचा प्रवास
१९८९ : ३ ऑगस्ट रोजी नाइस शहरात जन्म.
२००७ : कार्टिग सोडून ज्युल्सने फ्रेंच फॉम्र्युला रेनॉल्ट २.० शर्यतीत सहभाग घेतला. या शर्यतीत त्याने पाच वेळा जेतेपद पटकावले. तसेच त्याने फॉम्र्युला रेनॉल्ट युरो चषक स्पध्रेतही तीन वेळा सहभाग घेतला.
२००८ : फॉम्र्युला थ्री युरो सीरिजसाठी एआरटी ग्रां. प्री.ने ज्युल्सला करारबद्ध केले आणि पहिल्याच शर्यतीत त्याने तिसरे स्थान पटकावले. तसेच निको हल्केनबर्ग, डॅनिएल रिकिआडरे आणि मॅक्स चिल्टन या दिग्गज शर्यतपटूंना नमवून त्याने हॉलंड येथे झालेल्या मास्टर ऑफ फॉम्र्युला थ्री स्पध्रेत बाजी मारली.
२००९ : एआरटी संघासोबत राहण्याचा निर्णय घेत वॉल्टेरी बोल्टास आणि एस्टेबॅन गुटीएरेज या सहकाऱ्यांसह नऊ विजय मिळवून अजिंक्यपदावर दावा सांगितला.
२०११ : फॉम्र्युला वन शर्यतीकडे वाटचाल. फेरारी संघात राखीव शर्यतपटू म्हणून दाखल. त्यानंतर सहारा फोर्स इंडिया संघातही तो राखीव शर्यतपटू होता. नऊ सराव सत्रात सहभाग.
२०१३ : मरुसिआ फॉम्र्युला वन संघात मुख्य शर्यतपटूची संधी. पहिल्याच सत्रात मलेशियन ग्रां. प्री. शर्यतीत १३ वे स्थान पटकावले.
२०१४ : मरुसिआ संघाने ज्युल्सला संघात कायम राखले. ज्युल्सनेही मोनॅको शर्यतीत आठवे स्थान पटकावून संघासाठी पहिल्या गुणाची कमाई केली.

बिआंची कुटुंबीयांवर
पुन्हा शोककळा
१९६९ साली ज्युल्स बिआंचीचे काका ल्युसियन बिआंची यांचाही सर्किटवर अपघाती मृत्यू झाला होता. अल्फा रोमिआ टी ३३ या गाडीची लेन मान्स येथे चाचपणी करताना ल्युसियन यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी टेलिफोन पोलवर जाऊन आदळली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. इटलीत जन्मलेल्या, परंतु बेल्जियमकडून शर्यतीत सहभाग घेणाऱ्या ल्युसियन यांनी १९६८ साली २४ तासांची शर्यत जिंकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 3:18 am

Web Title: jules bianchi f1 driver no more
Next Stories
1 लेकुरे उदंड झाली
2 डागाळलेला चंद्र
3 ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
Just Now!
X