ज्युलेस बिआंची आणि संघातील अन्य सहकाऱ्यांनी सुरक्षेच्या नियमांची हेळसांड केल्यामुळे हा गंभीर अपघात घडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. याबाबत मॉरुसिया फॉम्र्युला-वन संघाने तीव्रपणे नाराजी प्रकट केली आहे. जॅपनीज ग्रां.प्रि. शर्यतीत फ्रान्सच्या बिआंचीचा अपघात झाला होता. तो आता जपानमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
मुसळधार पावसामुळे एड्रियन सुटिल याची कार याच ठिकाणी घसरली होती. त्यामुळे गाडीचा वेग कमी करण्यासाठी मार्शलने दोनदा पिवळा झेंडा दाखवला होता, या दाव्याचा मॉरुसियाने इन्कार केला आहे. जर्मनीच्या ‘स्पोर्ट्स बिल्ड’ मासिकाने म्हटले आहे की, सुझुकाच्या शर्यतीत कॅटरहॅमच्या मार्कस इरिक्सनपेक्षा कोणत्याही परिस्थितीत पुढे रहा, असा आदेश बिआंचीला देण्यात आला होता.