सुदिश शेट्टीला ‘दिव्यांग मुंबई-श्री’चा किताब :- मुंबई : शुभम धुरी आणि खुशाल सिंग यांचे कडवे आव्हान पार करत आपल्या पीळदार शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करणाऱ्या हेल्थ रूटीन फिटनेसच्या वैभव जाधव याने ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरले. ‘दिव्यांगांच्या मुंबई-श्री’ स्पर्धेत परब फिटनेसच्या सुदिश शेट्टीने बाजी मारली तर फॉच्र्युन फिटनेसच्या अभिषेक पाडगावकरने ‘नवोदित मुंबई-श्री’चा मान पटकावला.

मालाड पूर्वेला झालेल्या या स्पर्धेत चार विविध प्रकारांमध्ये झालेल्या २००पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ किताबासाठी सहा गटविजेत्यांमध्ये कडवी लढत रंगली होती. अखेर पंचांनी वैभव, शुभम आणि खुशाल यांच्या शरीरसौष्ठवाची तुलना केली. काही मिनिटांच्या चर्चेनंतर त्यांनी वैभव जाधवला किताब विजेता घोषित केले.

दोन गटांत झालेल्या ‘दिव्यांग-श्री’ स्पर्धेत १६ स्पर्धकांनी कमावलेली शरीरसंपदा पाहून प्रेक्षकही थक्क झाले. ५० आणि ५५ किलो वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत सुदिश शेट्टीने यश संपादन केले. ५० किलो गटात माँसाहेब जिमचा प्रथमेश भोसले पहिला आला.

शरीरसौष्ठवासाठी घर आणि शिक्षण सोडणाऱ्या वैभवची यशोगाथा!

तुषार वैती :- मुंबई : आयुष्यात यश संपादन करण्यासाठी काही वेळेला कठोर निर्णयही घ्यावे लागतात. शरीरसौष्ठवाची प्रचंड आवड जोपासणाऱ्या दापोली शहरातल्या वैभव जाधव याने या खेळात यश मिळवण्यासाठी घरच्यांशी भांडून घर सोडले. पण मार्गात शिक्षणाचा अडसर येत असताना त्याने शिक्षणही सोडण्याचा निर्णय घेतला. अखेर तीन-चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ किताबाला गवसणी घालत यशाच्या शिखरावर पहिले पाऊल टाकले आहे.

दापोलीत १२वीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याला शरीरसौष्ठवाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर कुटुंबासह त्याने आपला मुक्काम विरारला हलवला. १२वीनंतर वैभवने शिक्षणावरच लक्ष केंद्रित करायचे, हा घरच्यांचा तगादा कायम असायचा. परिणामी, त्याचे घरच्यांशी अनेकदा खटके उडायचे. याच भांडणातून एके दिवशी त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. विरारमध्येच भाडय़ाने घर घेऊन त्याने शरीरसौष्ठवात नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. अनेक अडी-अडचणींना सामोरे जात त्याने जिममध्येच प्रशिक्षक म्हणून नोकरी पत्करली. पण अडचणींचा डोंगर कमी होत नव्हता. मित्रपरिवाराच्या मदतीने त्याने आपली जिद्द कायम राखत शरीरसौष्ठवात प्रगती केली.

वर्षभराच्या रोषानंतर घरच्यांचा विरोधही मावळत गेला. २०१७मध्ये वैभव पहिल्यांदा शरीरसौष्ठवाच्या मंचावर उतरला. पण बाद फेरीतच त्याला अपयश आले. गेल्या वर्षी ७५ किलो गटातून तो पुन्हा ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ स्पर्धेत उतरला. पण त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावा लागले. अखेर खडतर परिश्रम घेत त्याने सुजल पिळणकर, मनीष आडविलकर तसेच मामेभाऊ दिनेश कासारे यांच्या मदतीमुळे उत्तम शरीरसंपदा मिळवली. दोन दिवसांपूर्वी मालाड येथे ‘कनिष्ठ मुंबई श्री’ किताबावर नाव कोरत वैभवने आपले स्वप्न साकार केले आहे.

‘‘तिसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माझ्या या कामगिरीवर घरची मंडळी बेहद खूश आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना या खेळात प्रगती करू शकलो, याचा आनंद आहे. आता राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये यश मिळवण्याचे माझे उद्दिष्ट आहे,’’ असे सांगताना वैभवच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

‘कनिष्ठ मुंबई-श्री’ स्पर्धेचा निकाल

  • ५५ किलो : १) प्रशांत सडेकर, २) यश महाडिक, ३) सुहास सावंत
  • ६० किलो : १) प्रीतेश गमरे, २) निमिष निकम, ३) सिद्धेश सुर्वे
  •  ६५ किलो : १) वैभव जाधव, २) दर्शन सणस, ३) अंकित केदारी
  •  ७० किलो : १) शुभम धुरी, २) चिन्मय राणे, ३) निखिल राणे
  • ७५ किलो : १) खुशाल सिंग, २) प्रफुल पाटील, ३) गणेश म्हाबदी
  •  ७५ किलोवरील : १) विनायक जैस्वाल, २) अनिकेत मयेकर, ३) विशाल कांगणे