अखिल भारतीय कनिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून चेन्नई येथे सुरुवात होत असून भारतातील एक हजारहून अधिक युवा खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पण या स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात गायत्री गोपीचंदवर सर्वाचे लक्ष असेल. भारताचे प्रशिक्षण पुलेला गोपीचंद यांची ही कन्या आहे.

मध्य प्रदेशच्या प्रियांशू राजावत हा मुलांच्या १९ वर्षांखालील एकेरी गटात सहभाग नोंदवेल. मणिपूरचा मैसनम मेइराबा त्याला आव्हान देण्याची शक्यता आहे. चेन्नईचा शंकर मुथ्थूस्वामीदेखील चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. साई चरण कोया, सतीश कुमार के. आणि आकाश यादव यांना मुलांच्या एकेरीमध्ये मानांकन देण्यात आले आहे, तर मुलींच्या एकेरीत आकार्षी कश्यप, मालविका बनसोड आणि उन्नती बिष्ट यांच्या कामगिरीवरही लक्ष असेल.

३२ मुले व मुली यांना मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळणार असून तर दुहेरीत (मुले, मुली व मिश्र) आठ खेळाडूंना प्रवेश देण्यात आला आहे. मनजित सिंग व दिंगकू सिंग यांना मुलांच्या दुहेरीत अव्वल मानांकन देण्यात आले आहे, तर ट्रेसा जॉली व वर्षीणी वी. एस. यांना मुलींच्या दुहेरीत अव्वल मानांकन देण्यात आले, तर मिश्र दुहेरीत नवनीथ बोका व साहीथी बांडी अग्रमानांकित असतील. पात्रता फेरीत पाचशेहून अधिक मुले व २२०हून अधिक मुली सहभाग नोंदवतील. मुख्य फेरीत पोहोचण्याचे त्यांचे लक्ष असेल.