ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात सुरु असलेल्या ज्युनिअर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या खात्यात दुसऱ्या सुवर्णपदकाची भर पडली आहे. भारताच्या अनिश भनवालाने २५ मी. रॅपीड फायर पिस्तुल प्रकारात भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पहिल्या फेरीपासून अनिशने या स्पर्धेत आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. अखेर ५८५ गुणांसह अनिशने आपलं पहिलं स्थान कायम राखतं सुवर्णपदक पटकावलं.

अनिश भनवालाव्यतिरीक्त अनहद जावंदा आणि राजकुंवर सिंह संधू या दोन भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत चौथं आणि सहावं स्थान मिळवलं. अंतिम फेरीत केवळ १७ गुणांच्या फरकाने अनहद जावंदाला पदकाने हुलकावणी दिली. अनिशने सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवल्यानंतर चीनच्या दोन खेळाडूंनी रौप्य आणि कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.