वंदना कटारियाने केलेल्या हॅट्ट्रिकमुळेच भारताने कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी रशियावर १०-१ असा दणदणीत विजय नोंदविला.
भारताने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून १-६ असा दारुण पराभव स्वीकारला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर २-० अशी मात केली होती. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी भारतास रशियाविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय मिळविणे अनिवार्य होते तसेच ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळविणे किंवा बरोबरी करणे आवश्यक होते. भारतासाठी अपेक्षेप्रमाणेच घडले. ऑसीला न्यूझीलंडने ३-३ असे बरोबरीत रोखले. हा सामना मोठय़ा फरकाने जिंकण्याच्या उद्देशानेच भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ केला. भारताने हा सामना जिंकून साखळी गटात सहा गुणांसह दुसरे स्थान मिळविले तर ऑस्ट्रेलियाने सात गुणांसह अव्वल स्थान घेतले. भारताकडून महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या वंदनाने सातव्या, १५ व्या व ३१ व्या मिनिटाला गोल केले. पूनम राणी हिने २२ व्या व २७ व्या मिनिटाला गोल केले.
राणीकुमारी हिने ३९ व्या व ४९ व्या मिनिटाला गोल नोंदविले. रितुषाकुमारी आर्य (४४ वे मिनिट) व मनजित कौर (६९ वे मिनिट) यांनीही प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयास हातभार लावला.
पूर्वार्धात भारताने ५-० अशी आघाडी घेतली होती. रशियाकडून भारताला एक स्वयंगोल मिळाला. रशियाचा एकमेव गोल अनास्ताशिया मिरोशिकोव्हा हिने ३६ व्या मिनिटाला केला.